पायलट बंधाऱ्यामुळे आठशे हेक्टर शेतात होणार दुबार पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:05 PM2019-12-02T13:05:18+5:302019-12-02T13:06:07+5:30
मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले.
भोजराज गोवर्धन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमी अंतरापर्यंत पाण्याचा संचय करण्यात आला आहे. त्यामुळे चिरोली परिसरातील सुमारे आठशे हेक्टर शेतात रब्बी पिकांची लागवड करता येणार आहे. त्यामुळे हा बंधारा चिरोली परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली ते सुशीच्या मध्यभागातून अंधारी नंदीचा मोठा प्रवाह वाहतो. येथे ९० मीटर लांब असलेल्या मोठ्या पुलाचे बांधकाम सन २०१५-२०१६ या वर्षात पूर्ण करण्यात आले. अंधारी नंदीच्या दोन्ही बाजुला शेती आहे. मात्र नदीतील पाणी केवळ खरीप हंगामात होते. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चांदा ते बांधा योजनेतंर्गत १९३.३१ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, शाखा अभियंता रूपेश बोदडे यांनी अथक परिश्रम घेत जानेवारी २०१९ पासून कामाला सुरुवात केली. सुमारे ९० मीटर लांब असलेल्या या बंधाऱ्याची उंची ३.५० मीटर असून ३.९३ लाख घनमीटर या बंधाऱ्यायाची साठवण क्षमता आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे पाणी सुमारे साडेपाच किमी अंतरापर्यत साठवणूक करता येते. त्यामुळे चिरोली, केळझर, सुशी, महादवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ घेता येणार आहे.
सदर बंधाऱ्यातील पाणी जवळ असलेल्या चार मामा तलावात सौर उर्जेच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. तसेच या चार तलावातील पाणी इतर पाच मामा तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे आठशे हेक्टर शेतामध्ये दुबार पेरणी करता येणार आहे. बधाऱ्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त सचिव प्रमोद बोंगीरवार, व्ही. एन. आय. टी. महाविघ्यालय नागपूरचे प्रा. डॉ. इंगडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता मनोजकुमार जयस्वाल आदींनी प्रयत्न केले.
मूलमध्ये पाच बंधारे प्रस्तावीत
मूल तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाखांचा पायलट प्रकल्प सहा महिण्यात पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना यश आहे आहे, यामुळेच आता ताडाळा येथे पूल आणि बंधाऱ्यांसाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे नऊ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे सहा कोटी, सिंतळा येथे १७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सिंचनाची अपुरी व्यवस्था असलेल्या चिरोली परिसरात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले पायलट प्रकल्पाचे बांधकाम केवळ सहा महिन्यात पूर्ण झाले. या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी कामात येणार आहे.
-प्रशांत वसुले उपविभागीय अभियंता