रस्ता बांधकामामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:50+5:302021-09-23T04:31:50+5:30
वरोरा (चंद्रपूर) : मागील काही वर्षांपासून चिमूर-वरोरा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामात चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी ...
वरोरा (चंद्रपूर) : मागील काही वर्षांपासून चिमूर-वरोरा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामात चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले असून सोयाबीन पीक पूर्णतः बुडाले आहे. सोयाबीनला शेंगा लागल्या असून सोयाबीन पाण्याखाली असल्याने त्याची प्रतवारी खराब होऊन शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा तालुक्यातील चारगाव बु. येथील शेतकरी मधुकर निलेकर, नितेश वटे, अरविंद वायकुळे, तिरुपती हिवरे, या शेतकऱ्यांनी तीन ते चार एकरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली तर विठोबा कुमरे या शेतकऱ्याने धानाची लागवड केली आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागल्या असून शेंगा परिपक्व झाल्या आहेत. येत्या काही दिवसात सोयाबीन पीक हातात येण्याची आशा शेतकरी बाळगून असताना चिमूर-वरोरा मार्गाचे काम सुरू आहे. चुकीच्या नियोजनाने या सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली बुडाली आहे. पिकावर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सोयाबीन पीक पाण्यात पडल्याने शेंगांना अंकुर फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होईल, परंतु अंकुर फुटल्याने सोयाबीनला अपेक्षित दर मिळणार नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
कोट
रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे पिके पाण्याखाली आली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी.
-राजेंद्र चिकटे, उपाध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना.
220921\img-20210921-wa0095.jpg
warora