77 हजार हेक्टर क्षेत्रात होणार सोयाबीन पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 05:00 AM2022-05-07T05:00:00+5:302022-05-07T05:00:07+5:30
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. घरगुती बियांण्यावर प्रक्रिया, उगवण क्षमता, तपासणी व प्रात्यक्षिक मेळाव्याचे तालुकास्तरावर आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे ७७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. गतवर्षी ७२२ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले होते. यावर्षी ९५० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केल्या.
यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. तेलंगणाच्या सीमेवरून चोरबीटी जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती आहे. वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कृषी विभागाने अतिशय दक्षपणे काम करावे. घरगुती बियांण्यावर प्रक्रिया, उगवण क्षमता, तपासणी व प्रात्यक्षिक मेळाव्याचे तालुकास्तरावर आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते खांबाडा येथील सुरेश गरमाडे या प्रगतिशील शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेती उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
तीन तालुक्यांत हळदीचे क्लस्टर
- भद्रावती, वरोरा व चिमूर या तालुक्यांत हळदीचे उत्पादन होते. जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होत आहे. हळद पिकाला चांगला भाव असून, पिकाच्या क्षेत्रवाढीसाठी क्लस्टर उभारण्यात येईल. याचा फायदा ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी होईल, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
प्रायोगिक तत्त्वावर डेअरी प्रकल्प
प्रायोगिक तत्त्वावर दुग्ध व्यवसायासाठी नागभीड, वरोरा, चिमूर, सिंदेवाही येथे मदर डेअरीचे प्रकल्प सुरू आहेत. या तालुक्यांत चारा लागवडीसाठीचे प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने पाठविणार आहे. महाज्योती अंतर्गत चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, नागभीड व वरोरा तालुक्यांत करडई पेरा वाढविणे, ब्रँडिंग व प्रोसेसिंगसाठी युनिट उभारण्याचा यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.