सार्वजनिक शौचालयाच्या भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:41 AM2017-06-22T00:41:24+5:302017-06-22T00:41:24+5:30
आजचे युग जाहिरातीचे युग आहे. आपले विचार लोकांच्या मनात रुजविण्याकरिता जाहिरातीच्या अनेक माध्यमांचा वापर केला जातो.
भद्रावती नगर परिषदेचा उपक्रम लोकप्रबोधनासाठी भिंतीचा वापर
यशवंत घुमे । लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : आजचे युग जाहिरातीचे युग आहे. आपले विचार लोकांच्या मनात रुजविण्याकरिता जाहिरातीच्या अनेक माध्यमांचा वापर केला जातो. कमीत कमी शब्दांचा आधार घेवून जास्तीत जास्त व मोठा आशय वाचकांच्या गळी उतरवण्याचे कार्य जाहिराती करीत असतात. परंतु भद्रावती पालिकेने शहरातील नागरिकांत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी वापरलेली क्लुप्ती प्रभावी ठरली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर पालिकेने लिहिलेला सचित्र घोषणा परिसरात उद्बोधनपर ठरत आहे.
जनमानसात जागृती घडविण्यासाठी प्रशासन नेहमीच क्रियाशिल असते. त्यासाठी प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमांचा वापर प्रभाविपणे केला जातो. पूर्वी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, भिंतीपत्रके, उद्घोषणा यांचा वापर व्हायचा. आता अलिकडच्या काळात वरील साधनाव्यतिरिक्त फेसबुक, व्हॉटस्अप यासारख्या सोशल मिडीयाचाही प्रभावीपणे वापर करून जनजागृती केली जात आहे. परंतु भद्रावती पालिकेने याही पुढे जावून शहरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर आशयपूर्ण चित्र काढून जनजागृतीपर स्लोगन लिहिले आहेत.
शौचालयाचा वापर करणाऱ्यांना व त्या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष शौचालयाच्या भिंती वेधून घेत आहेत. ‘सौ बकी आणि एक लिखी’ म्हणतात. त्याप्रमाणे शौचालयाच्या भिंतीवरील रंगीबेरंगी जाहिराती प्रभावीपणे जनजागृतीचे काम करीत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हे जनजागृतीचे माध्यम प्रभावी ठरत असून जसे स्वच्छ भारत सुंदर भारत, शौचालयाचा नियमीत वापर करा, एक कदम स्वच्छता की और, हागणदारी मुक्त भद्रावती शहर, अशी विविध उद्बोधनात्मक वाक्ये नागरिकांचे प्रभावी प्रबोधन करीत आहेत. उघड्यावर शौचास बसू नये, ते कायद्याने गुन्हा आहे. नियमित शौचालयाचा वापर करा, असा संदेश यातून देण्यात आला आहे.
शहरातील शाही चौक, भंगाराम वॉर्ड, बुरड मोहल्ला, विंजासन खापरी बेघर वार्ड, हिवरकर सोसायटी, डोलारा तलाव, भूमी अभिलेख कार्यालयाजवळ सार्वजनिक शौचालयावरील भिंतीचा वापर पालिकेने जनजागृतीसाठी अतिशय प्रभावीपणे केला आहे. या भिंती जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या मनावर स्वच्छतेचे महत्त्व बिंबवीत असून या शौचालयाच्या मुक्या भिंतीही सजीव बोलक्या झाल्याचे प्रचिती येत आहे.