झरी येथील शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:48+5:30
दोनशे ते तीनशे घराची वस्ती असलेल्या झरी गावात फक्त जिल्हा परिषद शाळा आहे. इतर सर्व कामासाठी खडसंगी, चिमुरचीच वाट धरावी लागते. त्यामुळे हे गाव विकास कामापासून कोसो दूर आहे. परिणामी या शाळेत शिक्षक यायला धजावत नाहीत.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल झरी गावातील एक ते चारपर्यंत वर्ग असलेल्या जि. प. प्राथमिक शाळेत मागील सत्रात रुजू झालेले कर्तव्यदक्ष व उपक्रमशील शिक्षक जनार्दन केदार यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अल्प महिन्यातच शाळेचे बाह्य रूप बदलविले. शाळेचा परिसर, भिंती बोलक्या झाल्याने शाळा व परिसर विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहेत.
दोनशे ते तीनशे घराची वस्ती असलेल्या झरी गावात फक्त जिल्हा परिषद शाळा आहे. इतर सर्व कामासाठी खडसंगी, चिमुरचीच वाट धरावी लागते. त्यामुळे हे गाव विकास कामापासून कोसो दूर आहे. परिणामी या शाळेत शिक्षक यायला धजावत नाहीत. मात्र शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक केदार यांनी सहाय्यक शिक्षिका राजश्री आकांत यांच्या मदतीने स्व:इच्छाशक्तीच्या बळावर शाळेचे रूप व शिक्षणपद्धती बद्दलविण्याची किमया अल्पवधीतच करुन दाखवली. पूर्वी जी शाळा भकास होती, ती शाळा आता विद्यार्थ्यांना मंदिरासारखी वाटू लागली. त्यामुळे बाहेर गावी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आता गावच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.
त्यामुळे एक अंकी पटसंख्या दोन आकड्यावर गेली आहे. यामागे गुरुजीचे श्रेय असल्याचे पालकवर्ग मोठ्या आनंदाने सांगत आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य एका आदर्श शिक्षकांच्या हातात असल्याचे समाधानही पालकवर्गांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे गावकरीसुद्धा शिक्षकांना शाळेसाठी मोठ्या आनंदाने सहकार्य करीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शाळा परिसरातील विद्यार्थ्यांना आकर्षीत करीत आहे.
गावकऱ्यांकडून शिक्षकाला अनोखी भेट
गावातील परंतु सध्या आरमोरी येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी आर. आर. खुरसंगे गावाला आले, असता शाळेचे बदलते रुप पाहून गावकºयांशी चर्चा करून एका कार्यक्रमाची योजना आखली. दरम्यान शिक्षक दिनी शाळेतील शिक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता एका कार्यक्रमाचे आयोजन करुन मुख्याध्यापक जनार्धन केदार व सहाय्यक शिक्षिका राजश्री आकांत याचा सत्कार केला. यावेळी पं. स सदस्य पुंडलिक मत्ते, सरपंच भरोष ढोक, उपसरपंच वासुदेव बावणे, ग्रा. पं. सदस्य यशोदा मसराम, वनिता निखाडे, प्रमोद खुरसंगे आदी उपस्थित होते