प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिर

By Admin | Published: October 10, 2016 12:40 AM2016-10-10T00:40:31+5:302016-10-10T00:40:31+5:30

वेस्टर्न कोलफिल्ड्स कंपनीशी संबंधित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले ...

Special camp for seeking guidance of project affected people | प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिर

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिर

googlenewsNext

मुनगंटीवार यांचे आदेश : सिनाळा व भटाळी प्रकल्पग्रस्त
चंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स कंपनीशी संबंधित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावणे आणि सिनाळा व भटाळी येथील ४०९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी दोन दिवसांच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, डब्ल्यूसीएलचे सीएमडी राजीवरंजन मिश्र, टी. एन. झा. डॉ. संजय कुमार, ए. सी. सिंग आणि प्रकल्पग्रस्त, भाजप नेते रामपाल सिंह उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या डब्ल्यूसीएल, महसूल विभाग आणि प्रकल्पगस्त यांच्या समन्वयातून शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीवर घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यासाठी त्या त्या ग्रामपंचायती, महसूल विभागाने त्यांच्या पातळीवर शक्य असतील ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी येत्या २४ आणि २५ आॅक्टोबर रोजी बाधित गावांमध्ये महसूल विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच प्रकल्पग्रस्तांनी सर्वप्रथम ४०९ जणांची यादी तयार करावी, त्यामध्ये उपलब्ध नसलेली कागदपत्रे किंवा त्यासाठीचे पुरावे, यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून उपलब्ध करुन दिली जातील. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनीही पुढाकार घेतला पाहीजे, शिबिरामध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Special camp for seeking guidance of project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.