रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:43 PM2018-09-01T23:43:38+5:302018-09-01T23:44:09+5:30
रिमोटद्वारे वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या वतीने शनिवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रिमोटद्वारे वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या वतीने शनिवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतु अलिकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीज चोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम आज शनिवारपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
रिमोटद्वारे वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीज चोरीची माहिती देणाºयांना वीज चोरीच्या रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. अलिकडच्या काही महिन्यात वीज चोरीचे प्रकार चांगलेच वाढले आहे. आता तर रिमोटचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीज चोरली जात आहे. त्यामुळे अशा वीज चोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यासाठी विशेष पथकही तयार केले आहे.
वीज चोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा
वीज चोरीच्या प्रकरणांमुळे वीज हानीसोबतच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीज चोरी कळवा आणि १० टक्के रकमेचे बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीज मीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून होणाºया वीज चोरीची माहिती असणाºयांनी पुढाकार घेत यासंबंधीची माहिती द्यावी, माहिती कळविणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी माहीती महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिली आहे.