खड्डे खोदण्याच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:12 AM2019-05-06T00:12:18+5:302019-05-06T00:12:41+5:30
३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून जो विभाग यात मागे आहे, त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी वृक्षलागवडीची प्रक्रिया व खड्ड्यांची सद्यस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात बैठक झाली. वनविभागाने या संदर्भात एक प्रणाली विकसित केली असून यामध्ये प्रत्येक घटनेची नोंद केली जाणार आहे.
आजच्या बैठकीमध्ये वनविभाग चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाचे अधिकारी, वेगवेगळ्या प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे विभाग, अधीक्षक अभियंता व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होत. या बैठकीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी आतापर्यंत किती खड्डे तयार केले, त्याबद्दल आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय वन अधिकारी तथा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे मुख्य संयोजक अशोक सोनकुसरे, एस. खरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सहाय्यक अभियंता रवींद्र हजारे, इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतस्तरावर व्याप्ती वाढवा
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद व ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन वेळेत पूर्ण होईल, याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायतस्तरावर या उपक्रमाची व्याप्ती वाढली पाहिजे, मोठया प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यभरातील जाणून घेतली स्थिती
या बैठकीच्या पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. ही चर्चा विविध मुद्यांवर व सखोल करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपणाच्या संदर्भात काय तयारी सुरु आहे, याबद्दलचा आढावा घेत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तेथील स्थिती जाणून घेतली.