इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:27+5:302021-06-18T04:20:27+5:30
पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन ...
पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पीककर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. हा खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा हा खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवत आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनजागृती करून शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात नागरिकांना सांगणे गरजेचे आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा उचलावा
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकतात. याकडे महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुकानात सोशल डिस्टन्सचा फज्जा
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहे.
जडवाहतुकीवर निर्बंध घाला
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर ट्रक फसण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वॉर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला.
उद्योग नसल्याने बेरोजगारी वाढली
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोणताही उद्योग नसल्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे उद्योगांची निर्मिती करून रोजगार मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते. त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्याने वाढल्या आहे.
नळयोजना सुरू कराव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
नाल्यांना झुडपांचा वेढा
चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची स्वच्छता करण्याची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही रस्त्यांवर केरकचरा, तसेच रेती साचली असून, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने रस्त्याची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी शहरातील वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडली आहे. दरम्यान, सध्या कोसळत असलेल्या पावसात नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.
पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवरील अनेक पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मनपाकडे केली आहे.