जिल्हा परिषदेतील प्रलंबित विकास कामांना येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:23+5:30
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे विकासकामांना बे्रक लागला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची कामे प्रलंबित होती. तब्बल २० दिवसांनंतर बुधवारी प्रशासकीय कामांची लगबग दिसून आली. विभाग प्रमुखांच्या स्वाक्षऱ्यांअभावी अडलेले फाईल्स बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांचा दिवस गेला. नागरिकांच्या व्यक्तिगत व सामूहिक कल्याणाच्या विविध योजना निवडणुकीमुळे ठप्प झाल्या होत्या. आता कामकाज सुरू झाल्याने या कामांना गती येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाली होती. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दखल करणे व अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. उमेदवारांनी नामनिर्देश पत्र मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे विकासकामांना बे्रक लागला होता. ग्रामीण विकास यंत्रणा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, ग्राम पंचायत, महिला व बालविकास, समाज कल्याण आणि कृषी विभागाच्या विविध योजनातंर्गत सुरू असलेली विविध विकासकामे बंद झाली.
नवीन विकास कामांबाबत पदाधिकाºयांना निर्णयच घेता आला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बराच निवांतपणा मिळाला. या कालावधीत जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली होती. २१ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. त्यानंतर लगेच २५ ऑक्टोबरपासून जिल्हा परिषद प्रशासनाने सुट्या जाहिर केल्या होत्या. बुधवारी जि. प. चे कामकाज सुरू झाल्याने प्रलंबित फाईलींवर विभाग प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या घेण्यातच कर्मचाऱ्यांचा वेळ गेल्याचे दिसून आले. रजेवर गेलेले कर्मचारी सोमवारी रूजू झाल्यानंतर विभाग प्रमुखांच्या उपस्थित प्रलंबित कामांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
बहुतांश कर्मचारी रजेवर
दिवाळी सुट्यानंतर बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाचा पहिला दिवस होता. दरम्यान ‘लोकमत’ने फेरफटका मारला असता विविध विभागांतील बहुतांश कर्मचारी अजुनही रजेवर असल्याचे दिसून आले. काही विभाग प्रमुखही कर्तव्यावर रूजू झाले नाही. त्यामुळे संबंधित विभागाची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी हा आठवडा जाण्याची शक्यता एका कर्मचाºयांनी वर्तविली.
कृषी विभागासमोर आव्हान
परतीचा पाऊस पडल्याने सोयाबीन, कापूस व भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकºयांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले. परंतु जिल्हा परिषद कृषी विभागातील बहुतांश कर्मचारी रजेवरच आहेत. तालुका स्तरावरही हिच स्थिती असल्याने पिकांच्या पंचनाम्याला विलंब होऊ शकतो. जि. प. कृषी विभागाकडे योजना नाहीत, असे रडगाने करण्याऐवजी सध्या सुरू असलेल्या योजना संकटग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
पदाधिकारी फिरकले नाही
विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर जि. प. पदाधिकारी दिवाळी सणामुळे कौटुंबीक कामांत व्यस्त झाले. त्यामुळे बुधवारी त्यांच्या कक्षामध्ये शुकशुकाट होता. अधिनस्त कर्मचारी कार्यालयीन कर्तव्य बजावताना दिसले.