हंगामपूर्व मशागतीला वेग
By admin | Published: June 5, 2016 12:36 AM2016-06-05T00:36:17+5:302016-06-05T00:36:17+5:30
मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे.
आता प्रतीक्षा पावसाची : शेतातील लगबग वाढली
चंद्रपूर: मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे. मशागतीपूर्व सर्वच कामे आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ प्रतीक्षा पावसाची आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपला लहरीपणा दाखविणे सुरू केले. जुलै, आॅगस्ट महिने म्हणजे खरे पावसाचे महिने म्हटले जाते. मात्र यावेळीही पावसाने आपली अवकृपाच दाखविली. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. नदी-नाल्यांमध्येही पाहिजे तसा पाऊस पडू शकला नाही. मागील वर्षी आपली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली होती. सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा होता. तरीही भगीरथ प्रयत्न करून शेतकऱ्यांनी कसेबसे आपले पिक वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज उचलून हंगाम केला होता. मात्र उत्पादन कमी आल्याने लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे कर्ज फेडायचे की कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, या विवंचनेत शेतकरी वर्षभर राहिला.
निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. सध्या सुर्याचा पारा ४६.८ अंशापार गेला आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. हंगामपूर्व मशागतीला आता चांगलाच वेग आला आहे. बि-बियाण्यांची व खतांची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे. यंदातरी पावसाने साथ सोडू नये आणि अतिरेकही करू नये, यासाठी साकडे घातले जात आहे. एकूणच आता शेतकऱ्यांनाही पावसाचीच प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)
४ लाख ६७ हेक्टर लागवडी क्षेत्र
यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र यंदा वरूणराजा शेतकऱ्यांवर कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगू शकणार आहे.
रबी पिकांचेही झाले नुकसान
मागील खरीप हंगामात तर निसर्गाने दगा दिलाच. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादन आले. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला. अत्यल्प पावसामुळे सिंचनाचा प्रश्न उदभवणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली नाही. काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली. मात्र ऐन पीक हाती येण्याच्या वेळेवर अकाली पावसाने तांडव केले. चार ते पाच वेळा वादळी वारा व गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी असतानाही शासनाने याकडे लक्ष दिले नाही.
पुन्हा कर्जाचे ओझे
मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. कर्ज डोक्यावर घेऊन पुन्हा शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहे. पुन्हा सावकराच्या दारात शेतकरी उभा ठाकला आहे. कर्जाचे ओझे यावेळी आणखी वाढणार आहे.