वॉर्डावॉर्डात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:48 PM2019-09-16T22:48:47+5:302019-09-16T22:49:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गणरायाला निरोप दिल्यावर आता ग्रामीण भागासह शहरातील वॉर्डावॉर्डात सर्वत्र नवरात्रोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणरायाला निरोप दिल्यावर आता ग्रामीण भागासह शहरातील वॉर्डावॉर्डात सर्वत्र नवरात्रोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे. त्यातही चंद्रपूर शहरात असलेल्या मंडळांची लगबग वाढली आहे. गणरायाला निरोप देऊ न मूर्तीकार आता दुर्गामातेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त झाले आहे. तर मंडळांकडून मंडप उभारणीचे तसेचवर्गणी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या २९ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वानाच तिच्या आगमनाची प्रतिक्षा लागली आहे.
दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात नवरात्रोत्सवाची धूम असते. यामुळेच प्रत्येक जण नवरोत्रोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवसात शहर गजबलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामाता विराजमान राहत असल्यने हे दिवस नवचैतन्याने भरलेली असतात.
येत्या २९ तारेखेला घटस्थापना असून तिचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची धावपड सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक असावे यासाठी मंडप उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सावाची ख्याती असल्याने त्यांचे काम जोमता सुरू आहे. मूर्तीकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त आहेत. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. सुटीचा दिवस बघून मंडळाचे सदस्य वर्गणी गोळा करीत आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश वार्डामधील दुर्गा तसेच शारदा मंडळ महिलांचे असल्याने त्यांची तयारी वाखान्याजोगी आहे. बैठका घेऊन नियोजन केले जात असून प्रशासकीय स्तरावर विविध परवानगी सुद्धा घेतली जात आहे.
बंगाली कॅम्प परिसरात
दुर्गा मातेच्या मूर्ती शहरातील बरेच मूर्तिकार बनवतात. मात्र बंगाली कॅम्प परिसरातील मूर्ती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागातही मोठ्या संख्येने मंडळ असून मंडळाच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जातो. शहरातील काही भागामध्ये दांडिया स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यांची दुकाने सजली
दुर्गा, शारदा मातेच्या श्रृंगारासाठी लागणारे दागिने, शस्त्र व अन्य साहित्यांची दुकान सज्ज झाली आहेत. आता काही दिवस मातेच्या आगमणासाठी उरलेले असल्याने व ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी मंडळांकडून साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे दुकानदारांनी मातेला लागणारे साहित्य मागवून ठेवले असून दुकान सज्ज करून ठेवले आहे. यामुळेच दुकानात आतापासून गर्दी बघायला मिळत आहे.