योजनांचा लाभ प्रत्येकांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: June 23, 2017 12:32 AM2017-06-23T00:32:41+5:302017-06-23T00:32:41+5:30
पाण्याचा प्रत्येक थेंब जीवनाशी निगडीत आहे. सिंचन विभागाचे नाव जलसंपदा करण्यात आल्याने एकप्रकारे पाणी ही आपली संपत्ती आहे.
सुधीर मुनगंटीवार : मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टकडून जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पाण्याचा प्रत्येक थेंब जीवनाशी निगडीत आहे. सिंचन विभागाचे नाव जलसंपदा करण्यात आल्याने एकप्रकारे पाणी ही आपली संपत्ती आहे. राज्यातील पाणी टंचाई दूर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या अभियानात स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग तसेच उद्योजक सहभागी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्टने जलयुक्त शिवारासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा एकप्रकारे बाप्पाचा शेतकऱ्यांना प्रसाद असल्याने या कामासाठी आलेल्या निधीचा अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक उपयोग करावा, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवन येथे जलयुक्त शिवारासाठी उपलब्ध केलेल्या निधीच्या धनादेश वाटपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे, सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, विश्वस्त डॉ. हरिष सणस, महेश मुदलीयार, स्मिता बांद्रेकर उपस्थित होत्या.
सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे गतवर्षीसुद्धा जलयुक्त शिवारासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ट्रस्टमध्ये गोळा होणारा प्रत्येक पैसा भक्तांचा आहे. भक्तांच्या पैशातून शेतकऱ्यांसाठी मदत होत आहे, ही गौरवास्पद बाब आहे. आलेला प्रत्येक पैसा शासकीय यंत्रणेने योग्य ठिकाणी खर्च करावा. एकप्रकारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत सिध्दीविनायक ट्रस्टचा हा आर्शिवाद प्रत्येक जिल्ह्यात पोहचत आहे. ज्या गावात या निधीतून कामे होत आहे, तेथे सिध्दीविनायक ट्रस्टचे फलक लावावे. जेणेकरुन ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती प्रत्येकाला होईल.
जलयुक्त शिवार या अभियानातून राज्याचा कायापालट होणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ट्रस्टच्या धनादेशरुपी प्रसादाचा उपयोग शेवटच्या माणसापर्यंत पोहचेल याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे तसेच हरीश सणस यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सिध्दीविनायकाची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांनी तर संचालन नायब तहसीलदार कांचन जगताप यांनी केले.
सिद्धीविनायक ट्रस्टकडून कोट्यवधींचा निधी
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी केलेल्या आवाहना,ा सिध्दीविनायक ट्रस्टने तत्काळ प्रतिसाद देऊन निधी उपलब्ध करुन दिला. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येक १ कोटी याप्रमाणे ३४ कोटी रुपये मार्च व एप्रिल २०१५ मध्ये दिले होते. यानंतर मार्च २०१६ मध्ये प्रती जिल्हा १९ लक्ष ११ हजार रुपये याप्रमाणे ३४ जिल्ह्यांना ६ कोटी ५० लक्ष रुपये सिद्धीविनायक ट्रस्टकडून अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले होते.
१० जिल्ह्यांना १० कोटींच्या धनदेशाचे वाटप
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नागपूर महसूल विभागातंर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया तसेच अमरावती महसूल विभागातंर्गत यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम अशा एकूण १० जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे १० कोटींच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. नागपूर विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त बोंदरे यांनी तर अमरावती विभागाचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त मावसकर यांनी धनादेश स्वीकारले.