कोरोना सुटीमुळे विद्यार्थ्यांचे बिघडले हस्ताक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 12:35 PM2021-12-15T12:35:56+5:302021-12-15T18:49:21+5:30
शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शाळांना सुटी होती. काही ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आला. मात्र हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाकडे बहुतांश विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाले. आता शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.
कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर आता ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, जे विद्यार्थी शाळा न बघताच वर्गोन्नत झाले आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना साध्या अक्षराचीही ओळख नाही. दुसरी, तिसरीच्याही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले असून त्यांची लिहिण्याची गतीही मंदावली आहे. यामुळे शाळेत शिकविताना शिक्षकांना त्रास होतो आहे. वाचन करतानाही अनेक विद्यार्थी अडखळत आहेत.
विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक पत्र काढून विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष तसेच वळणदार हस्ताक्षर काढण्यावर भर देण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बघण्यासाठी वेळोवेळी अधिकारी भेट देणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. हस्ताक्षराची केवळ लातूरच नाही तर राज्यभरातील विद्यार्थ्यांची समस्या आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेसारखी अन्य जिल्ह्यांनीही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
स्माईल लोगाेचा वापर अनिवार्य
विद्यार्थ्यांचे सुलेखन, हस्ताक्षर सुधारण्यासाठी लातूर जि. प.ने मोहीम सुरू केली आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर तसेच शुद्धलेखनासाठी सराव करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या वहीमध्ये स्माईल लोगो काढावा, असेही पत्रात म्हटले आहे.
दीर्घ सुटीमुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. अनेकांना सरळ रेषा तसेच वळणदार अक्षर काढणे कठीण जात आहे. लहान वयातच त्यांचे अक्षर सुधारणे, सुलेखन महत्त्वाचे असते. लातूर पॅटर्ननुसार शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांत अशी मोहीम सुरू करणे सध्या अत्यावश्यक आहे.
- जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर