क्रीडा संकूल विविध समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: January 12, 2015 10:47 PM2015-01-12T22:47:37+5:302015-01-12T22:47:37+5:30

गाव तिथे क्रीडांगण ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. परंतु प्रशासन व क्रीडा अधिकाऱ्यांच्या

The Sports Complex Knowledge of Different Problems | क्रीडा संकूल विविध समस्यांच्या विळख्यात

क्रीडा संकूल विविध समस्यांच्या विळख्यात

Next

सिंदेवाही : गाव तिथे क्रीडांगण ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. परंतु प्रशासन व क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सिंदेवाही येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम रेंगाळत आहे.
सिंदेवाही हे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असून या तालुक्यात अनेक प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या गावातील खेळाडूंनी हॉकी, बास्केटबॉल, धनूर्विद्या स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तावर प्रतिनिधीत्त्व केले आहे. काही प्रतिभावंत खेळाडू संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सिंदेवाही तालुक्यासाठी गडमौशी येथील गट नं. २८२ मधील चार हेक्टर जागा क्रीडा संकुलाकरिता महसूल विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर क्रीडा संकुलाची जागा सिंदेवाही ते पाथरी एस.टी. मार्गावर हुमन सिंचाई प्रकल्प कार्यालयाजवळ आहे. सदर जागेवर क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्याकरिता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १७ फेब्रुवारी २००४ ला मंजुरी दिली. त्यानुसार शासनाने संकुल बांधकामाकरिता २५ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले. यामध्ये ४०० मीटर (धानपथ) ट्रॅक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलचे प्रत्येकी दोन मैदाने तर बॉस्केटबॉल करीता सिमेंट कोर्ट आणि फुटबॉल व हॉकीची मैदाने यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत क्रीडा संकुलात हॉलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु संकुलापर्यंत जाण्याकरिता पथदिव्याची व्यवस्था नाही. क्रीडा संकुलाला संरक्षक भिंत नाही. क्रीडा संकुलाला लागून जंगल आहे, त्यामुळे वन्य प्राण्यापासून संसरक्षण मिळण्याकरिता संरक्षक भिंत आवश्यक आहे. क्रीडा संकुलात खेळण्याकरिता फुटबॉल, व्हॉलीबॉल व हॉकीचे मैदान तयार करण्यात आले नाही. बास्केटबॉल खेळण्याकरिता सिमेंट कोर्ट नाही. क्रीडा संकुलाला लागून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भात संशोधन केंद्र, विभागीय कृषी संशोधन प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्राची कार्यालये आहेत. निधी अभावी सिंदेवाही येथील क्रीडा संकुलाचे अंतर्गत बांधकाम पाच वर्षापासून थंड्या बस्त्यात पडून आहे. क्रीडा संकुलाची कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी क्रीडा मंडळ व खेळाडूंनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Sports Complex Knowledge of Different Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.