SSC Result 2019: मृणाली गहाणे चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:57 PM2019-06-08T20:57:35+5:302019-06-08T20:57:58+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. नवरगाव येथील भारत विद्यालयातील मृणाली मनोहर गहाणे ही ९५.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यानंतर चंद्रपूर येथील भवानजीभाई चव्हाण विद्यालयातील विशाल महादेव मासीरकर हा ९५.२० टक्के हा द्वितीय तर याच विद्यालयातील अनुराग भारत भोंगळे व चंद्रपूर येथील विद्या विहार कॉन्व्हेंटचा तन्मय वड्डेलवार हे दोघेही ९५ टक्के गुण घेत तृतीय आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ३० हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ३० हजार १२३ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी १९ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील दोन हजार ३६८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्ह्यात निकालात चंद्रपूर तालुका अव्वल राहिला. चंद्रपूर तालुक्याचा निकाल ७१.०५ टक्के लागला. तर चिमूर तालुका ५२.४५ टक्के घेत पिछाडीवर राहिला.