सेवाभावातून धावतेय लालपरी; चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यात ८.५० कोटी रूपयांची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:28 PM2020-07-10T18:28:34+5:302020-07-10T18:29:08+5:30
महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे.
रवी जवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. आजघडीला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे.
परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात जवळपास २५० बस नियमितपणे धावतात. चंद्रपूर विभागात येणाऱ्या चार आगारांच्या माध्यमातून लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे काम लालपरी करते. २५० बसेसच्या जवळपास एक हजार फेºया दररोज एसटीच्या होतात. एसटीचा प्रवास विश्वासाचा व सुरक्षित असल्याने बसेस आजपर्यंत नेहमीच कचाकच भरत आल्या आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत राहिले.
मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून आजपर्यंत हे लॉकडाऊन व कोरोना संसर्ग अविरत सुरूच आहे. लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच तब्बल तीन महिने एसटी जागेवरच थांबली.
परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेºयाच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
२५० पैकी ६० बसेस रस्त्यावर
चंद्रपूर जिल्ह्यात महामंडळाच्या जवळपास २५० बस असून त्यापैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. एरवी चंद्रपूर जिल्ह्यातील बसेस राज्याच्या कानाकोपºयात धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व सेवा विस्कळीत झाली आहे. केवळ जिल्ह्यांतर्गतच बसफेऱ्या सुरू आहेत. या ६० बसेसच्या माध्यमातून दररोज केवळ ३०८ फेऱ्या होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात
राज्यात लॉकडाऊनपासून बंद असलेली लालपरी २२ मेपासून जिल्ह्य अंतर्गत सुरू झाली. यामधे शासनाने अनेक निर्बंध घालून बस सुरू केली. त्यात ५० टक्के प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. मर्यादित बसफेºया असल्याने दररोज ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच पाचारण करण्यात येत आहे. एसटी तोट्यात चालत असल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे ५० टक्के पगार देण्यात आले तर जून महिन्याचे तर वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उत्पन्न पूर्वीचे आणि आताचे
लॉकडाऊन नसताना जून महिन्यात २५० बसेसच्या माध्यमातून सुमारे एक हजार फेऱ्या दररोज होत होत्या. यातून दररोज ३० लाख रुपयांचे उत्पन्न दररोज व्हायचे. मात्र आता ६० बसेस सुरू असून त्यामाध्यमातून केवळ ३०८ बसफेऱ्या आणि त्यादेखील जिल्ह्यांतर्गत सुरू आहे. त्यामुळे जून महिन्यात केवळ ४५ लाख रुपयांचेच उत्पन्न होऊ शकले. साडेआठ कोटींचा घाटा महामंडळाला सहन करावा लागला.
जिल्ह्यात २५० बसेसपैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून बससेवा दिली जात आहे. ५० टक्केच प्रवाशी बसविले जात असल्याने महिन्याकाठी महामंडळाला साडेआठ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.
-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,
एसटी महामंडळ, चंद्रपूर.