ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 04:55 PM2021-11-08T16:55:28+5:302021-11-08T17:26:45+5:30
ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
चंद्रपूर : ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर वय ३० वर्षं यांचा त्यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली असून सोमवारला उघडकीस आली आहे.
सविस्तर प्राप्त माहितीनुसार मृतक सत्यजित सिंग ठाकूर नागपूरचे रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून ब्रह्मपुरी आगारात वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. ते ब्रम्हपुरी आगाराच्या मागील परिसरात किरायाने वास्तव्यास राहत होते.
सध्या राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे. परिणामी ब्रह्मपुरी आगारांमध्ये वाहक आणि चालक संपावर असल्यानेही बसेस बंद आहेत. परंतु मृतक हे कार्यालयीन कामकाज पहात असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नव्हते असे सांगण्यात आले आहे.
परंतु मृतक हे आपल्या पत्नीचा फोन उचलत नव्हते. त्याच्या पत्नीने आगारातील कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली असता कर्मचारी त्याच्या घरी गेले असता सत्यजित सिंग ठाकूर हे पलंगावर मृत अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रोशनकुमार यादव यांनी तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. व मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन कुमार यादव यांचे मार्गदर्शनाखाली सुरेंद्र उपरे पी एस आय पोलीस हवालदार अरुण पिसे करीत आहेत.
दरम्यान, किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांआधी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तर, आता ठाकूर यांच्या संशयास्पद मृत्यूनेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.