एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतोे; ना वैद्यकीय बिले मिळतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 05:00 AM2021-09-15T05:00:00+5:302021-09-15T05:00:46+5:30
एसटी महामंडळ पूर्वीपासूनच आर्थिक तोट्यात असते. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नच ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही महामंडळाला आर्थिक सुबकता आली नाही. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर वेतनावर आला. परिणामी कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या वेतनाला बराच विलंब लागत आहे. कधी दहा दिवस तर कधी महिना संपून पंधरवडाही उलटतो. तरीही वेतन मिळत नाही. यासोबतच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. आता या महामंडळाची चाके पूर्ववत येत आहेत. मात्र अद्यापही उभारी मिळाली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेहमीच दिरंगाई होत आहे. यासोबत वैद्यकीय बिलेही वेळेत मिळत नसल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच आर्थिक संकटाला सामोर जावे लागते. मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी महामंडळाला मोठा फटका सहन करावा लागला. एसटी महामंडळ पूर्वीपासूनच आर्थिक तोट्यात असते. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नच ठप्प झाले होते. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही महामंडळाला आर्थिक सुबकता आली नाही. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर वेतनावर आला. परिणामी कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या वेतनाला बराच विलंब लागत आहे. कधी दहा दिवस तर कधी महिना संपून पंधरवडाही उलटतो. तरीही वेतन मिळत नाही. यासोबतच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेदेखील रखडली आहेत.
वैद्यकीय बिले मिळण्यास बराच विलंब
एकीकडे कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांंना मेडिकल सुविधांची बिलेदेखील वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाकाळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही व त्यात स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण याच्याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे
कधी पंधरवडा, तर कधी दिवस उशिरा वेतन
कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन काही प्रमाणात नियमित होत होते. मात्र कोरोनाचे संकट असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. महिना भरल्यानंतर कधी दहा दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी वेतन मिळते. काही वेळेस तर दोन महिने वेतन थकीत होते. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
उपचारावर झालेला खर्च आणायचा कुठून ?
कोरोनाबरोरबरच इतर आजाराने महामंडळातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना ग्रासले होते. अनेकांना रुग्णालयात भरती करावे लागले. कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या डॉक्टरांकडे औषधोपचार केला. त्याची बिलेदेखील कार्यालयामध्ये जमा केली. मात्र अद्यापपर्यंत त्याची रक्कम जमा झाली नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांकडून होत आहे.