भक्कम सुट, दुचाकींची लूट
By admin | Published: April 1, 2017 01:34 AM2017-04-01T01:34:22+5:302017-04-01T01:34:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून बीएस-३ वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
रेकॉर्ड ब्रेक विक्री : आरटीओ कार्यालय वाहनधारकांच्या गर्दीने फुलले
दिवसभरात झाली १२०० वाहनांची विक्री
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून बीएस-३ वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मोटार कंपन्यांनी आपल्याजवळील बीएस-३ वाहनांचा स्टॉक संपविण्यासाठी ३० व ३१ मार्चला वाहन खरेदीवर विशेष सवलत जाहीर केली. याचा फायदा घेण्यासाठी शेकडो ग्राहकांनी सवलतीच्या दरात वाहनांची खरेदी केल्याने दोन दिवसांत उपप्रादेशिक कार्यालयात जवळपास ६०० नव्या वाहनांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांच्या विक्रीला व नोंदणीला बंदी घातल्याने वाहन कंपन्यांनी धसका घेतला.
कंपन्यांनी २९ मार्चला विशेष सवलत जाहीर करून ३० व ३१ मार्चला वाहन खरेदीवर सवलत लागू होती. यात अनेक वाहनांवर १२ हजार रूपयांपासून तर २० हजार रूपयांपर्यंत सूट होती. त्यामुळे गुरूवार व शुक्रवारी या दोन्ही दिवशी वाहनांच्या शो-रूम मध्ये ग्राहकांनी गर्दी केली. मात्र स्थानिक शो-रूम मधील वाहनांचा स्टॉक संपल्याने जवळपास सर्वच शो-रूम मध्ये बीएस-३ वाहने संपल्याने बॅनर लावण्यात आले होते. मात्र ग्राहक शो-रूम कर्मचाऱ्यांना भेटून सवलतीच्या दरात विक्रीचे कोणते वाहन उपलब्ध असल्याचे सारखे चौकशी करीत होते.
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांच्या फक्त विक्री आणि नोंदणीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर धावण्याला कोणतीही अडचण नसल्याने मोटार कंपन्यांनी सुटीवर या वाहनांची विक्री सुरू केली. ३० मार्च रोजी जवळपास २०० तर ३१ मार्च रोजी जवळपास ४०० वाहनांची नोंद झाल्याची माहिती उपप्रादेशिक कार्यालयाने दिली.
आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने याच दिवशी वाहनांच्या नोंदणीसाठी वाहनधारकांची गर्दी झाल्याने उशीरापर्यंत नोंदणीचे काम सुरू होते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.(स्थानिक प्रतिनिधी)
दोन दिवसांत नव्या ६०० वाहनांची नोंदणी
चंद्रपूर : बीएस-३ इंजिन असणाऱ्या दुचाकी वाहनांवर १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आज बुधवारी भरमसाठ सूट देऊन दुचाकी वाहनांची विक्री करण्यात आली. आज एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात बाराशे दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. चंद्रपूर शहरात ११ दुचाकी वाहनांच्या शोरुम आहेत. या डिलरचे जिल्हाभरात ७१ सपडिलर आहेत. या सर्व शोरुममध्ये आज दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी उसळली होती. एकाच दिवशी पूर्ण जिल्हाभरात १२०० दुचाकी वाहनांची विक्री करण्यात आली. असे असतानाही अद्याप या डिलर्सकडे १५ टक्के दुचाकी वाहनांचा स्टॉक शिल्लक असल्याची माहिती यामाहा शोरुमचे संचालक वैभव पलिकोंडवार यांनी दिली.
रेकॉर्ड ब्रेक नोंदणी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दररोज साधारणत: शंभर ते दीडशे नव्या वाहनांची नोंदणी होत असते. मात्र वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर सवलत जाहीर केल्याने नोंदणी तब्बल दुप्पट झाल्याचे सांगितले. ३० मार्च गुरूवारला २०० ते २५० वाहने तर ३१ मार्च शुक्रवारला ३५० ते ४०० वाहनांची नोंद झाल्याचे सांगितले.