फलाटावर दुचाकी उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:48 PM2018-01-10T23:48:39+5:302018-01-10T23:49:13+5:30
सामाजिक व्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनाने नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीचे पालन करणे हे सामान्य नागरिकांपासून तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सामाजिक व्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनाने नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीचे पालन करणे हे सामान्य नागरिकांपासून तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम आहे. मात्र शासनाच्या या नियमांची ऐसीतैशी करून नियमच पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार एसटी बसस्थानकावरील दुचाकी वाहनांच्या वाट्टेल तिथे पार्किंगवरून दिसून येते. ‘ये पब्लिक कब सुधरेगी’ हे शब्द काहींच्या तोंडून ऐकायला मिळाले.
एसटी बसस्थानकाचे काही नियम आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. मात्र नियमच धाब्यावर बसविले जात आहेत. चंद्रपूर बसस्थानकाला भेट दिली असता, दुचाकी वाहनांच्या वाट्टेल तिथे होत असलेल्या पार्किंगवरून हा प्रकार निदर्शनास आला.
आप्तेष्टांना सोडताना दुचाकी फलाटावर
अनेक दुचाकी वाहनचालक आपल्या आप्तेष्टांना सोडायला किंवा घ्यायला आल्यानंतर अडचण न येणाºया जागी वाहन पार्किंग न करता कुठेही वाहने उभे करतात. काही जण तर थेट फलाटावरच दुचाकी उभी करतात. तर काही जण मध्येच वाहन उभे करून प्रतीक्षा करीत असतात. यामुळे बस चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागते.
बस रिव्हर्स घेताना महिलेचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी वरोरा बसस्थानकावर बसगाडी रिव्हर्स घेताना एक महिला बसच्या मागच्या चाकाखाली आली. यात तिचा मृत्यू झाला होता. बसस्थानकावर एसटी बसगाड्यांची वर्दळ असते. काही बसगाड्यांना फलटावर लागताना किंवा फलाटावरून सुटताना रिव्हर्स घ्यावे लागतात. अशावेळेस चालकांना मागचे सर्वच दिसत नसल्याने अपघात घडत आहेत.
फ्री-पार्किंगची व्यवस्थाच नाही
चंद्रपूर बसस्थानकावर कुठेच फ्री-पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. बसस्थानकासमोर नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र येथे फळविक्रेत्यांना जागा दिल्याने येथेही वाहने पार्किंग करता येत नाही. आतमध्येही पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने उभे करण्याचा प्रश्न निर्माण होतो.
गडचिरोली फलाट अधिक धोकादायक
चंद्रपूर बसस्थानक परिसर विस्तीर्ण असला तरी चारही बाजुला लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात धावणाºया बसगाड्या उभ्या असतात. यातच बसस्थानकावर प्रवेश करताच पहिले दोन फलाट गडचिरोली, ब्रह्मपुरी मार्गाचे आहेत. गडचिरोली, ब्रह्मपुरी येथून आलेली बसगाडी वळण घेवून या फलाटावर लागत असते. मात्र या फलाटालगत पोलीस चौकी व पानटपरी असल्याने येथे अनेकजण वाहन उभे करतात. येथे ‘नो पार्किंग’ असे फलक लागले असतानाही दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे बस फलाटावर लावताना चालकाला खबरदारी घ्यावी लागत असते.
कारवाईची आता भीतीच उरली नाही
बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी नो पार्किंग फलक लावण्यात आले आहेत. येथे वाहन उभे केल्यास पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाहने उचलून नेत कारवाई केली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकारणात मोठा वाद झाल्याने अनेक महिन्यांपासून पोलिसांनी अशी कारवाई थांबविली आहे. त्यामुळे आता वाट्टेल तिथे दुचाकी वाहने उभी केली जात असल्याचा प्रकार चंद्रपूर बसस्थानकावर सर्रास सुरू असल्याचे दिसून आले.
सहा कर्मचारी नियुक्त
बसस्थानकाची सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी सहा कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दुचाकी वाहनधारकांना वाहने लावण्याबाबत सतत सूचना देत असतात. मात्र ते उपस्थित नसल्यास कुठेही दुचाकी वाहने उभी केली जातात.
बसस्थानकावर फ्री-पार्किंगची व्यवस्था नाही. मात्र अडचण येईल अशा ठिकाणी वाहनधारकांनी दुचाकी वाहने उभी करू नयेत. हा प्रकार थांबविण्यासाठी फ्री-पार्किंगची लवकरच व्यवस्था केली जाईल.
- विजय कुडे,
आगार व्यवस्थापक, चंद्रपूर