स्थायी समिती सभापतीपदी पुन्हा पावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:42 PM2019-04-15T22:42:41+5:302019-04-15T22:42:55+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. मात्र यावेळी देखील राहुल पावडे यांची सभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. मात्र यावेळी देखील राहुल पावडे यांची सभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली.
मनपाच्या स्थायी समिती सभापती, झोन सभापती या पदांचा कार्यकाळ संपल्यामुळे सोमवारी या पदांसाठी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. यासाठी मनपाच्या सभागृहात दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली. स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे राहुल पावडे तर शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल रिंगणात होते. यापैकी दीपक जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत अर्ज मागे घेतल्याने राहुल पावडे यांची निवड अविरोध झाली.
यासोबतच झोन क्र. १ मधे बंटी उर्फ प्रशांत एकनाथ चौधरी, झोन क्र. २ मधे कल्पना बगूलकर यांची झोन सभापती पदी अविरोध निवड झाली. झोन क्र. ३ मधे सभापती पदासाठी शिवसेनेचे सुरेश पचारे व अली अहमद मंसूर हे रिंगणात होते. हात उंचावून मतदान करण्याच्या प्रक्रियेत झोनच्या उपस्थित १७ सदस्यांपैकी सुरेश पचारे यांना ११ मते तर अली अहमद मंसूर यांना ६ मते प्राप्त झाली. यात सुरेश पचारे यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
वर्तमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची सभापतीपदी यंदा तिसरी टर्म असणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व झोन सभापती निवडणुकीसाठी अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी काम पाहीले. याप्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व स्थायी समिती सदस्य, उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त विजय देवळीकर, सचिन पाटील, शीतल वाकडे, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, नगरसचिव सुभाष ठोंबरे, शहर अभियंता महेश बारई तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.