धान खरेदीचे २४ केंद्र सुरू
By Admin | Published: October 29, 2016 12:45 AM2016-10-29T00:45:20+5:302016-10-29T00:45:20+5:30
जिल्ह्यातील धान पिकाविणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य विक्री करता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात २४ खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : मार्केटिंग फेडरेशनचे १३ तर आदिवासी विकास महामंडळाचे १९ केंद्र
चंद्रपूर : जिल्ह्यातील धान पिकाविणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य विक्री करता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात २४ खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. २४ आॅक्टोंबरपासून हे खरेदी केंद्र सुरू झाले असून यात मार्केटींग फेडरेशनचे १३ तर आदिवासी विकास महामंडळाच्या १९ केंद्रांचा समावेश आहे.
२०१६-१७ या खरीप पणन हंगामासाठी शासनाने १९ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभुत किमतीचा लाभ मिळावा या हेतुने बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-आॅफ मार्केटिग फेडरेशन यांच्या मार्फत १३ धान खरेदी केंद्र व आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत १९ धान खरेदी केंद्र २४ आॅक्टोबरपासून सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मान्यता दिली आहे. या सर्व केंद्रावर धान खरेदी सुरु झाली आहे.
आधारभूत योजने अंतर्गत धान खरेदीचे दर हे अ दर्जाच्या धानाकरिता प्रति.क्विटल १५१० व साधारण धानाकरिता १४७० प्रति.क्विटल असे शासनाने ठरवून दिलेले आहेत. मात्र या किंमतीमध्ये बोनसचा समावेश करण्यात आलेला नाही. किमान आधारभुत किंमत योजनेत केंद्र शासनाने ठरविलेल्या निकषाच्या आधारे निदेर्शात बसणारे ‘अ’ दजार्चेच धान्य खरेदी केल्या जाणार असून धानाचे आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त १७ टक्के इतके असावे. तेव्हा शेतकऱ्यांनी आपले धान स्वच्छ व कोरडे करुन विक्रीस आणावे. नमूद प्रमाणपेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान खरेदी केंद्रावर स्वीकारल्या जाणार नाही, असेही प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे या खरेदी केंद्राबा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. (स्थानिक प्रतिनिधी)
सातबारा आणणे अनिवार्य
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणताना सोबत आधार कार्ड व बॅकेचे पासबुक घेवून यावे. तसेच चालु वर्षाच्या सातबारा उताऱ्यावर धानाची नोंद असलेल्या सातबाराची प्रत सोबत आणणे अनिवार्य केले आहे.
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
तालुका निहाय खरेदी केंद्राची नावे जाहिर करण्यात आली असून खरेदी केंद्रावर धान उत्पादक शेतकऱ्यांना काही अडचण भासल्यास त्याची माहिती पणन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापन बोंगीरवार व गजानन कोटलावार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.