चंद्रपुरात शुक्रवारपासून होणार बांबू तंत्रज्ञान अभ्यासक्रमाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:23 AM2017-09-28T00:23:06+5:302017-09-28T00:23:19+5:30
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत बांबू विषयक पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत बांबू विषयक पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन व बांबू वस्तुचे प्रदर्शनाचे उद्घाटन २९ सप्टेंबरला वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात दुपारी १ वाजता होणाºया या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये बांबूपासून मूल्य जोडणी करुन विविध वस्तू बनविण्याचे काम सुरु आहे. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्रात प्रथमच या संशोधन केंद्रामार्फत सुरु करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम २ वर्ष कालावधीचा असून महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ यांच्याशी संलग्नीत असणार आहे. या संशोधन केंद्राचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील बांबूवर आधारित बुरड व इतर समाजातील लोकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध देण्यास मोठा हातभार लागणार आहे.
चंद्रपूरचे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली येथे लवकरच उभे राहणार आहे. सध्या रेंजर कॉलेजमध्ये कार्यशाळेत या संदर्भातील कार्यशाळा सुरु आहे. या प्रशिक्षण केंद्रातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी केली आहे.
या बांबू प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना काम मिळणार आहे.