ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:19 AM2018-01-12T00:19:42+5:302018-01-12T00:19:58+5:30
गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
रवी रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिनेकलावंतांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.
ब्रह्मपुरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आयोजक विजय वडेट्टीवार, मुख्याधिकारी मंगेश खवले व अभियान प्रमुख मुन्ना रामटेके यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई करण्यात आली. यामध्ये शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, महिला वर्ग आदी बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता तहसील ग्राऊंडवरून रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली. विविध देखावे लक्ष वेधून घेत होते. बेटी बचाव, व्यसन, सर्वधर्म समभाव, गोंडी नृत्य, घोडे, लेझीम तथा विशिष्ट पोशाखात विद्यार्थी व विद्यार्र्थिनींनी सहभाग घेतला होता. रॅलीत आयोजक आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळू राऊत, विलास विखार, मनोज कावळे, नंदू पिसे, नितीन उराडे, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रतिभा फुलझेले, अशोक रामटेके, रश्मी पेशने आदी सहभागी झाले होते.
सिनेकलावंतांचे आकर्षण
महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून सिनेअभिनेता सयाजी शिंदे तर अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता असरानी, सिनेअभिनेत्री मुग्धा गोडसे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुकर, प्रा. राजेश कांबळे, अशोक रामटेके आदी उपस्थित होते. यावेळी असरानी यांनी ब्रह्मपुरी महोत्सवाची प्रशंसा करून आयोजनाला दाद दिली. सिनेकलावंत हे उद्घाटनीय कार्यक्रमाचे आकर्षण होते.