चिमूरमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ
By Admin | Published: November 12, 2016 12:56 AM2016-11-12T00:56:29+5:302016-11-12T00:56:29+5:30
चिमूर तालुका हा धान क्षेत्र असुनसुद्धा परिसरात कापसाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते.
प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार
चिमूर : चिमूर तालुका हा धान क्षेत्र असुनसुद्धा परिसरात कापसाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. मात्र कापुस विक्रीकरीता परिसरात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, तसेच बाजारपेठेत शेतकऱ्यांची फसवणुक थांबविण्याकरिता चिमुरमध्ये दोन वर्षापूर्वी चिमूर कॉटन इंडस्ट्रीजची निर्मिती करण्यात आली. व त्याद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पायपिट व फसवणुक थांबली आहे.
चिमूर येथील महाराष्ट्र औद्योगीक विकास केंद्रातील चिमूर कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कापुस खरेदी शुभारंभ मंगळवारला दुपारी १.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बकारामजी मालोदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी चिमूर प्रेस असोसियेशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास धनोरे, डॉ . दिलीप शिवरकर, कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक अनिल मेहर, प्रमोद गोहणे, सचिन लाखे, अश्वीन ठाकरे व प्रविण बारापात्रे उपस्थीत होते. यावेळी फीत कापूण उद्घाटक मालोदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच पाहुण्याच्या हस्ते धरम काटयाचे विधीवत पुजन करण्यात आले .
यावेळी कापुस विक्रीकरिता प्रथम येणारे शेतकरी आयुष कामडी , दुधाराम श्रीरामे, किशोर रोकडे रा.नवेगाव पेठ, अनिल पाचभाई रा.मांगलगाव, पांडूरंग गायधनी रा. चिमूर, यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
चिमुरमध्ये कापूस खरेदी सुरु करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची होणारी पायपीट व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणुक थांबणार आहे. यावेळी कापसाचा प्रांरंभीचा भाव चार हजार ७५० रुपये ठरविण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन एम .एम . कामडी सर यांनी केले तर प्रास्ताविक अनिल मेहर यांनी केले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)