'आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा'; सुधीर मुनगंटीवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 07:49 PM2023-10-25T19:49:33+5:302023-10-25T19:50:01+5:30

चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.

'Start buying soybeans at base price'; Minister Sudhir Mungantiwar's letter to CM Eknath Shinde | 'आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा'; सुधीर मुनगंटीवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र

'आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा'; सुधीर मुनगंटीवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र

चंद्रपूर: सोयाबीनच्या उत्पन्नात झालेली घट, सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असलेले सोयाबीनचे बाजारभाव आणि शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवून तात्काळ मान्यता देण्याची शिफारस केंद्र शासनास करावी, असेही पालकमंत्र्यांनी पत्रात नमुद केले आहे.

चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ६७ हजार ७६६  हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले. याबाबत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली होती. 

पाहणीअंती सोयाबीन पीक पिवळे पडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, पावसाचा खंड पडणे आणि जमिनीचे तापमान ३१ ते ३२ अंशापर्यंत पोहोचणे व त्याचा परिणाम म्हणून विविध सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव होणे असे असल्याचे निदर्शनास आले होते. या दरम्यानच सोयाबीन पिकावर मुळकुज, खोडकूज व रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. अशा विविध रोगामुळे या दोन्ही जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेवर अत्यंत विपरीत परिणाम झाला असून सोयाबीनचे हेक्टरी उत्पन्न घटले आहे.

सोयाबीनसाठी ४६०० रुपये इतके किमान आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये बाजारात किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी, कमी उत्पन्न आणि कमी बाजारभाव अशा दुहेरी संकटात सापडला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी योजना सुरू करण्याबाबत शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

पालकमंत्र्यांनी केली होती नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी-

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सप्टेंबर महिन्यात राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचाही प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग दिसल्याने क्षणाचाही विलंब न करता मुनगंटीवार यांनी यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा केली होती.

Web Title: 'Start buying soybeans at base price'; Minister Sudhir Mungantiwar's letter to CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.