धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:26 PM2018-10-15T23:26:10+5:302018-10-15T23:26:33+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. बुद्ध तत्वज्ञानाला समाजमनात रूजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केले. या तत्वज्ञानातूनच जगात शांती नांदेल. असा आत्मविश्वास समाजमनात पेरण्यासाठी सोमवारपासून चंद्रपुरात ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामूहिक बुध्दवंदनेनंतर वाहन रॅलीचे जटपुरा गेट मार्गाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले.
ही वाहन रॅली दीक्षाभूमीवर पोहचताच समारंभाचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. यावेळी धम्मध्वजाचे प्रतिक असलेले फुगे आकाशात सोडण्यात आले. भदंत ज्ञानज्योती महास्थवीर संघरामगिरी यांच्या हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना भदंत ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६२ वर्षांपूर्वी अभुतपूर्व क्रांती घडविली. विषमतेविरोधात लढा लढला. सनातनी व्यवस्थेविरुध्द समानतेचे बिगुल फुंकले. समाजबांधवांचे आध्यात्मिक व भौतिक जीवनमान सुधारण्यासाठी भगवान तथागत बुध्दांचा धम्म दिला. या सत्धम्माला धम्मभूमीवरून गतिमान करा. आजघडलीला जगभरात युध्दाचे सावट दिसून येत आहे. विश्वाला युध्दाची नाही तर बुध्दांच्या विचारांची गरज आहे. डॉ. आंबेडकरांना धम्मदीक्षेचा सोहळा पंढरपुरात घ्यावयाचा होता. मात्र बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्नेहसंबंधामुळे नागपूर व चंद्रपूर येथे धम्मदीक्षेचा समारंभ घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. जीवनात पंचशिलाचे पालन करायला पाहिजे. जीवन आनंदमय करण्यासाठी चिताची शुध्दी आवश्यक आहे. ही शुध्दी विपश्यनेद्वारे प्राप्त होते, असेही ते म्हणाले.
आज मुख्य समारंभ
१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. देवेंदर सिंग, उच्च शिक्षण नागपूर विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, डॉ. रतन लाल उपस्थित राहणार आहेत.