‘त्या’ पाच कोळसा खदानी सुरु कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:40 AM2019-08-10T00:40:07+5:302019-08-10T00:40:54+5:30
भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे. यातील उत्कृष्ठ व मोठ्या प्रमाणात कोळसा असलेल्या पाच खदानी वेकोलिने घेऊन त्वरित सुरु कराव्या, या मागणीसाठी चंद्रपूर-वणी आर्णी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय कोळसा मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथील कोळसा मंत्र्यांच्या दालनात भेट घेतली. संबंधित कोळसा खदानी सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कोळशाची ज्यास्त क्षमता असलेल्या खदानीमध्ये भद्रावती तालुक्यातील भांदक पश्चिम ३६ मिलीयन टन, टाकळी- बेलोरा, जेना उत्तर ७० मिलीयन टन, टाकळी, बेलोरा, जेना दक्षणी ४२ मिलीयन टन, वरोरा तालुक्यातील बांदेर १२६, वरोरा १०१ मिलीयन टन या पाच खदानी आहे. मागील दोन वर्षात माजरी क्षेत्रातील तेलवासा, ढोरवासा, जुना कुनाडा, नवीन कुनाडा या चार खदानी कोळसा काढण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे येथील जवळपास ९०० कामगारांना दुसऱ्या क्षेत्रातील खदानींमध्ये स्थानांतरित करण्यात आले. अपुºया जमिनीमुळे येत्या दोन ते तीन वर्षात परिसरातील दोन खदानी बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या खदानी बंद पडल्यास माजरी क्षेत्राचे अस्तित्वच नाहिसे होणार आहे. माजरी क्षेत्राचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी या क्षेत्रात नवीन खदानी सुरु करणे आवश्यक आहे, याकडेही खा. धानोरकरांनी लक्ष वेधले. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, धनंजय गुंडावार, मोरेश्वर आवारी, दिलीप पारखी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात कोल मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिले.