चंद्रपुरातील फ्लाइंग क्लब फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू करा: सुधीर मुनगंटीवार

By राजेश मडावी | Published: January 11, 2024 03:54 PM2024-01-11T15:54:54+5:302024-01-11T15:55:06+5:30

मुंबईतील बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

Start flying club in Chandrapur by Feb-end Sudhir Mungantiwar | चंद्रपुरातील फ्लाइंग क्लब फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू करा: सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरातील फ्लाइंग क्लब फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू करा: सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाइंग क्लबसंदर्भात अनुषंगिक कामांच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत फ्लाइंग क्लब सुरू होईल, या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मुंबई येथील आढावा बैठकीत दिले. यापूर्वी २६ जानेवारी रोजी फ्लाइंग क्लब सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला तरी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून चंद्रपूरवासीयांच्या स्वप्नांची पूर्ती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंत्री मुनगंटीवार म्हणाले, फ्लाइंग क्लबच्या अनुषंगाने ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्याअनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तत्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान तीन शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. सीएसआर फंडातून उद्योगपतीकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Web Title: Start flying club in Chandrapur by Feb-end Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.