प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

By admin | Published: February 4, 2017 12:36 AM2017-02-04T00:36:05+5:302017-02-04T00:36:05+5:30

राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून ...

Start of hunger strike for project affected farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

Next

मागण्यांची पूर्तता करा : प्रशासन व वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
राजुरा : राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून २४ तास उलटूनही वेकोलि आणि प्रशासनाचे एकही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळाला भेट दिली नाही. वेकोलिने इतर ३७२ हेक्टर जमीन अधिगृहीत करुन घेतली. परंतु वेकोलि आणि केंद्र शासनाच्या निष्क्रीय धोरणामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
राजुरा येथे विलास घटे, बाळू जुलमे, राजु मोहारे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, सोनु गाडगे असे सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून या भागातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्या समर्थनार्थ पेंडालमध्ये बसले आहे. वेकोलि प्रशासन खदान सुरु करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. शेतीवर लागणाऱ्या सेक्शनमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्याचबरोबर वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणाने शेतीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. सदर प्रक्रिया गेली पाच वर्षापासून वेकोलिने सुरु केली आहे. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार या आशेने दुसरीकडे कुठेही गुंतवणूक न करता वेकोलीने दिलेल्या आश्वासने बळी पडले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मुला-मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न, घरातील आर्थिक परिस्थती, आरोग्याच्या समस्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी नरकयातना भोगत आहे. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांवर करो या मरो ची अवस्था झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणात वेकोलिच्या बड्या अधिकाऱ्यांशी वारंवार निवेदन देवून विचारपूस केली असता येथील अधिकारी आणि वरील अधिकाऱ्यांनी सांगीतलेल्या माहितीत तफावत आहे. या अगोदर समस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ८०० ते ९०० च्या संख्येने भवानी माता मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत मुक मोर्चा काढून निवेदने दिली. लवकरात लवकर शेती अधिग्रहीत करुन नोकरी आणि शेतीचा मोबदला द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु. आमच्या १०८० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांपैकी जगदीश गजानन मोहारे यांनी शेतात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करुन आपले जीवन संपविले. इतर शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येऊ नये, याची वेकोलि व शासनाने काळजी घ्यावी व ३१ मार्च २०१७ च्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)

राजकीय नेत्याची भेट
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळाला राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे यांनी भेट दिली.
आंदोलन तीव्र
करण्याचा इशारा
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा इशारा विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजु मोहारे, मनिषा पायघन, शालू पिंपळकर, मनिषा बोबडे, अर्चना मोहारे, विजया कुबडे यांच्यासह विविध गावातील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

Web Title: Start of hunger strike for project affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.