आरटीओतून परवाने देणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:00 AM2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:00:17+5:30
नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प पडले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वाहन परवान्याचे कामही बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. दरम्यान, आता शिकावू वाहनधारकांना परवाने देण्याच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे काही प्रमाणात हा, होईना दिलासा मिळाला आहे.
परवाना देणे बंद असल्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या सर्वांची विचार करून प्रशासनाने काही अटी, शर्तींवर परवाना देणे, दुय्यम करणे आदी कामे तसेच वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे मागील २५ मार्चपासून बंद असलेली सर्व कामे आता सुरू झाली आहे. यासाठी नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत. चाचणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनावर केल्यास प्रत्येकवेळी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे सूचनांचे पालन करीत आरटीओ कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे.
गर्दी टाळावी लागणार
परिवहन कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिलेल्या अटीनुसार कामे करावी लाहणार आहे. वाहन चालक परवाना देताना याकरिता कुठल्याही शिबिराची मात्र परवानगी देण्यात आली नाही.
वाहनांना करावे लागणार सॅनिटाइज
लॉकडाऊन कालावधीमध्ये शिकाऊ परवाना जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांच्या परवान्याची वैधता संपली आहे, अशांची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा अनुज्ञप्तीधारकांची तसेच पक्क्या अनुज्ञप्ती धारकांची कामे प्राधान्याने करावी, पक्की अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यापूर्वी वाहन सॅनिटाइज केले अथवा नाही याची खतरजमा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
अनेकांनी भरले ऑनलाईन अर्ज
वाहन परवाना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले. अनेकांना तारीखही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर यामध्ये दुरुस्ती केली. आता पुन्हा त्याच उमेदवारांना नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे.