राणी हिराई संगीत महोत्सवाला प्रारंभ
By Admin | Published: January 31, 2016 12:52 AM2016-01-31T00:52:55+5:302016-01-31T00:52:55+5:30
अभिजात संगिताच्या क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करुन चंद्रपूरला लौकीक प्राप्त करुन देणाऱ्या तथा नवव्या वर्षात पर्दापण करणाऱ्या ...
भरगच्च उपस्थिती : आज होणार महोत्सवाचे दुसरे सत्र
चंद्रपूर : अभिजात संगिताच्या क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करुन चंद्रपूरला लौकीक प्राप्त करुन देणाऱ्या तथा नवव्या वर्षात पर्दापण करणाऱ्या राणी हिराई संगित महोत्सवाला आज शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात स्नेहांकितद्वारे आयोजित या महोत्सवाचा प्रारंभ गिटार तथा व्हायोलिनच्या जुगलबंदीने झाला. दिल्ली आकाशवाणीचे केंद्र प्रमुख संतोष नाहर तथा बेंगुलरुचे विख्यात गिटार वादक प्रकाश सोनटक्के यांच्यात ही जुगलबंदी रंगली. संगित रसिकांनीही या वाद्यांचा व त्यातून प्रसवणाऱ्या सुरांचा मनमुराद आनंद घेतला. या दोन्ही कलावंतांना तबल वादनाची साथ पुण्याचे प्रसिद्ध तबला वादक चारुदत्त फडके यांनी दिली. याच सत्राचे समापन हुबळीचे तरुण, तडफदार गायक क्रिष्णेंद्र वाडीकर यांनी केले. ते किराणा घराण्याचे गायक असून आज संगीता जगतात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांना तबल्यावर साथ कारंजालाडचे सुप्रसिद्ध तबला वादक धिरेंद्र गावंडे यांनी दिली.
समारंभाचे दुसरे सत्र ३१ जानेवारीला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. यात भोपाळच्या नामवंत गायिका शाश्वती मंडल आपले गायन सादर करतील. त्यांना तबल्याची साथ मुंबईचे अभय दातार करणार असून हार्मोनियमची साथ नामवंत वादक अनंत जोशी करणार आहेत. अनंत जोशी ठाण्याचे असून संगीत जगतातील ज्येष्ठ गायकांना साथ करण्याची त्यांना अनेकदा संधी प्राप्त झालेली आहे.
समारोपीय तिसरे सत्र ३१ जानेवारीला सायंकाळी ६.३० ला सुरु होणार असून त्यात प्रथम सारेगम स्पर्धेचे विजेते विश्वजीत बोरवणकर शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. विश्वजीत हे सुगम संगीताच्या विश्वात सुप्रसिद्ध आहेत. परंतु चंद्रपूरकराना ते शास्त्रीय संगीताची मेजवानी देणार आहेत. त्यांना हार्मोनियम व तबल्यावर अनंत जोशी व अभय दातार साथ करणार आहेत.यानंतर महोत्सवाची सांगता लोकप्रिय बासरी वादक अमर ओक करणार आहेत. चंद्रपूर संगीत रसिकांना हा महोत्सव दरवर्षी एक पर्वणी ठरत आहे, हे येथे उल्लेखनीय. (शहर प्रतिनिधी)