नांदाफाटा येथे आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:07+5:302021-05-01T04:27:07+5:30
गडचांदूर येथे एकमेव आरटीपीसीआर तपासणी केंद्र असल्याने या ठिकाणी फार मोठी गर्दी असते. एकट्या गडचांदूरात ४० हजार लोकसंख्या आहे. ...
गडचांदूर येथे एकमेव आरटीपीसीआर तपासणी केंद्र असल्याने या ठिकाणी फार मोठी गर्दी असते. एकट्या गडचांदूरात ४० हजार लोकसंख्या आहे. त्यातल्या त्यात अल्ट्राटेक, माणिकगड, अंबुजा, दालमिया या सिमेंट कंपन्यांतील अधिकारी व कामगार याच ठिकाणी तपासणी करतात. रोज केवळ १०० लोकांची आरटीपीसीआर चाचणी होत असल्याने व गर्दी असल्याने अनेक लोक पॉझिटिव्ह असतानादेखील चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याचा विपरित परिणाम बाधितांच्या परिवारावर होत असून, त्यामुळे संपूर्ण परिवार पॉझिटिव्ह येत आहे.
आरोग्य विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक गावात तापाची साथ पसरली आहे. मात्र, लोक चाचण्या करण्यासाठी घाबरत आहे. गडचांदूर येथे गर्दी असल्याने आरटीपीसीआर केंद्राच्या ठिकाणीच संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नांदाफाटा येथे एक आरटीपीसीआर केंद्र स्थापन केल्यास चाचण्या वाढेल आणि संसर्गसुद्धा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ३५ हजार लोकसंख्येच्या केंद्रस्थानी नांदाफाटा येथे आरटीपीसीआर केंद्र दिल्यास गडचांदूर केंद्रावरील ताण थोडाफार कमी होईल, अशी मागणी ग्रामपंचायत बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्यासह नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, नांदा येथील माजी सरपंच घागरू कोटनाके, निवृत्ती ढवस, नरेंद्र अल्ली, महेश राऊत, आदींनी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली आहे.