सोयाबीन शेतमाल तारण योजना प्रारंभ
By admin | Published: October 28, 2016 12:45 AM2016-10-28T00:45:01+5:302016-10-28T00:45:01+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या
चंद्रपूर बाजार समिती : शेतकऱ्यांचा माल ठेवला तारण
चंद्रपूर: कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने सोयाबिन शेतमाल तारण योजना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार, रामनगर येथे सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत प्रथम आनंदराव आवारी यांचे १४ पोते सोयाबिन, सुनील वरारकर यांचे ६० पोते आणि किसन पिंपळकर यांचे ४८ पोते सोयाबिन तारण योजनेत ठेवलेले आहे.
शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व उपसभापती रणजित डवरे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार समितीचे संचालक विजय बलकी, गोविंद पोडे, चंद्रकांत गुरु, योगेश्वर बोबडे, निरज बोंडे, विजय टोंगे, गंगाधरराव वैद्य, सुनील फरकाडे, नामदेव जुनघरे, अरविंद चवरे, संतोष चिल्लरवार, प्रभाकर सिडाम, अल्का वाढई, शेभा वरारकर, शिला मेकलवार व शोभा ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी तारण योजनेत प्रथम सोयाबिन ठेवणारे शेतकरी आनंदराव आवारी, सुनील वरारकर आणि किसन पिंपयकर यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चोखारे व उपसभापती डवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून सदर योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा व आपले शेतमालाला योग् भाव मिळवावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती चोखारे व उपसभापती डवरे यांनी केले.
सदर योजनेत शेतमाल ठेवल्यास बाजार समितीकडून ताबडतोब ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून देण्यात येते. दिलेल्या रकमेवर सहा टक्के प्रमाणे व्याज दसादशे आकारणी करण्यात येते. विमाखर्च, गोदामभाडे आदी शेतकऱ्यांना माफ करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)