वेळेच्या आधीच सिनेमा सुरू; ‘झाॅलीवूड’ च्या रसिकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 05:00 AM2022-06-05T05:00:00+5:302022-06-05T05:00:38+5:30
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजताच्या शोची तिकिटे बुक केली होती. परंतु हा सिनेमा १ तासापूर्वीच, म्हणजे १०.३० वाजताच सुरू करण्यात आला. प्रेक्षक निर्धारित वेळेवर टॉकीजमध्ये गेल्यानंतर वेळेपूर्वीच सिनेमा सुरू झाल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवरील सध्या चर्चेत असलेला ‘झॉलीवूड’ हा सिनेमा महाराष्ट्रातील सिनेमागृहात ३ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. पूर्व विदर्भातील १३० कलावंत असलेल्या या सिनेमाला स्थानिक कलावंतांच्या भूमीतच उपेक्षित राहावे लागत असल्याचा प्रकार शनिवारी चंद्रपुरातील नोवा सिनेमागृहात समोर आला. सिनेमाची निर्धारित वेळ सकाळी ११.३० वाजताची असताना एक तासापूर्वीच सिनेमा सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक कलावंतांचा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली. वेळापूर्वी सिनेमा सुरू केलाच कसा, असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित करत सिनेमागृहात गदारोळ घातला. एका तासाच्या गदारोळानंतर पुन्हा १२ वाजता सिनेमा सुरू करण्यात आला.
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजताच्या शोची तिकिटे बुक केली होती. परंतु हा सिनेमा १ तासापूर्वीच, म्हणजे १०.३० वाजताच सुरू करण्यात आला. प्रेक्षक निर्धारित वेळेवर टॉकीजमध्ये गेल्यानंतर वेळेपूर्वीच सिनेमा सुरू झाल्याचे समोर आले. तेथील कर्मचाऱ्यांनी सिनेमा संपला, आता थेट उद्याला या, अशी बतावणी प्रेक्षकांना केली. त्यामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर झाला.
यावेळी चित्रपटातील स्थानिक अभिनेत्री निशा धोंगडे उपस्थित होत्या. त्यांनी थेट सिनेमागृहाच्या संचालकांशी संपर्क साधून या प्रकारावर रोष व्यक्त केला. तसेच पुन्हा चित्रपट दाखविण्याची मागणी केली. प्रेक्षकांचा रोष बघून संचालकांनी सर्वांना १२ वाजताचा मोफत सिनेमा दाखविला.
चित्रपटाचा फलकच नाही
- एरवी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहात मोठमोठे पोस्टर लावण्यात येतात. परंतु मातीतील कलावंतांच्या या मराठी सिनेमाचे पोस्टरच सिनेमागृहाने लावले नाही. मात्र, तिथे इतर हिंदी चित्रपटांचे मोठे पोस्टर लागलेले आहेत. यावरून स्थानिक कलावंतांची सिनेमागृहाने उपेक्षाच केल्याचे दिसून येते.
अत्यंत संघर्षानंतर झाटीपट्टी रंगभूमी रुपेरी पडद्यावर आली आहे. त्यामुळे सिनेमागृह संचालकांनी आपल्या मातीतल्या कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. परंतु, चंद्रपुरातील सिनेमागृहाने वेळेपूर्वीच चित्रपट सुरु करुन कलावंताची उपेक्षाच केली. - निशा धोंगडे, अभिनेत्री