मुंबई, पुणेसाठी रेल्वे सुरू करा; प्रवासी संघाने सुरू केले उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:55 PM2024-10-10T12:55:57+5:302024-10-10T12:57:05+5:30
वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ : तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुंबई, पुणेसाठी नियमित रेल्वे सुरू करावी, विविध एक्स्प्रेस गाड्यांचा वरोरा येथे थांबा द्यावा, बल्लारशहा ते नागपूर, वर्धा, अमरावती, शेगावसाठी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, बल्लारशहा ते हावडा नवीन एक्स्प्रेस सुरू करावी, रेल्वे स्टेशनवर डिस्प्ले बोर्ड लावावे या व अन्य मागण्यांना घेऊन वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे मागील तीन दिवसांपासून वरोरा येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रवासी संघटनेने घेतला आहे.
वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली खेमचंद नेरकर, अशोक बावणे आणि प्रवीण गंधारे यांच्यासह अन्य सदस्यांनी उपोषण सुरू केले.
सध्या जिल्ह्यासाठी रेल्वेची सुविधा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. औद्योगिक जिल्हा असतानाही मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्यासाठी नियमित ट्रेन नाही. त्यामुळे आता प्रवासी संघटनांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला विविध सामाजिक, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
नियमित रेल्वे नसल्याने तसेच वरोरा येथे काही रेल्वेचा थांबा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना एसटीने किंवा खासगी बसने प्रवास करावा लागतो. यामध्ये आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्यासह अन्य सदस्यांनी दिला आहे. यावेळी प्रवासी संघाचे राहुल देवडे, बबलू रॉय, जगदीश तोटावार, विलास दारापूरकर, प्रवीण सुराणा, विवेक बर्वे, छोटूभाई शेख, शाहिद अख्तर, डॉ. मुधोळकर, ठाकूरदास मर्दाने, जुबेर कुरेशी, तुषार मर्दाने आदींची उपस्थिती होती.
वेळोवेळी आंदोलन
मुंबई, पुणेसाठी नियमित रेल्वे सुरु करण्यासाठी विविध प्रवासी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र अद्यापतरी जिल्ह्याला न्याय मिळाला नाही. मालवाहू रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, मात्र प्रवाशांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.