ग्रंथदिंडीने विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2016 01:09 AM2016-01-30T01:09:34+5:302016-01-30T01:09:34+5:30
मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला.
साहित्य रसिकांची गर्दी : विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभाग
चंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला.
दुपारी २ वाजता आझाद बगीचा येथून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी सिनेनिर्माता तथा दिग्दर्शक, लेखक शंतनू रोडे, कार्याध्यक्ष वामन तेलंग, संमेलन निमंत्रक प्रकाश एदलाबादकर, स्वागताध्यक्ष प्रा. विजय बदखल, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, आदी उपस्थित होते.
गं्रथदिंडीत चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यात विद्यार्थिनींचा लेझीम पथक आकर्षण ठरला. वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा विविध घोषणा देत ग्रंथदिंडीत सहभागी विद्यार्थी समोर जात होते. विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून विविध वेशभूषा साकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन ग्रंथदिंडीच्या माध्यामातून घडले. जटपुरा गेटवर ग्रंथदिंडीवर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. ही ग्रंथदिंडी जटपुरा गेट वरून रामनगर चौक मार्गे पोलीस फुटबॉल मैदान स्व. शरद जोशी साहित्यनगरी येथे पोहोचली. येथे ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
साहित्य रसिकांसाठी आज भरगच्च कार्यक्रम
३० जानेवारीला सकाळी १० वाजता ‘शेतकरी, संवेदनाहीन समाज आणि शासकीय धोरण’ या विषयावर अॅड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होईल. यात श्रीनिवास खांदेवाले, गजानन अहमदाबादकर, कृष्णा घड्याळपाटील यांचा सहभाग राहणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता कथाकथन डॉ. दिलीप अलोणे यांच्या अध्यक्षतेत होईल. त्यानंतर ‘स्त्रीवादी साहित्य दिशाहीन झाले आहे’ या विषयावर दुपारी २.३० वाजता परिसंवाद होणार आहे. ‘झाडीपट्टीतील लोककला, लोकनाट्य आणि रंगभूमी : वर्तमान वास्तव’ या विषयावर डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेत सायंकाळी ५ वाजता परिसंवाद होणार असून यात डॉ. श्रीकांत नाकाडे, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, ग.रा. वडपल्लीवार, प्रा. धनराज खानोरकर यांचा सहभाग राहणार आहे.