लॉकडाऊनच्या धास्तीने साठवणूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:27 AM2021-04-15T04:27:40+5:302021-04-15T04:27:40+5:30
जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत ९ एप्रिल रोजी ‘वीकेंड लॉकडाऊन’ रात्री ८ वाजता लागू केला होता. त्यामुळे ...
जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत ९ एप्रिल रोजी ‘वीकेंड लॉकडाऊन’ रात्री ८ वाजता लागू केला होता. त्यामुळे सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे अथवा फिरण्यास कलम १४४ अन्वये प्रतिबंध घालण्यात आला. हा वीकेंड लॉकडाऊन’ सोमवारी सकाळी ७ वाजता संपला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवस संचारबंदीची घोषणा केली. त्याच दिवशी रात्री ८ वाजता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे थोडी शिथिलता देण्यात आली. उद्यापासून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बाजारात ग्राहकांची तोबा गर्दी
जीवनाश्यक वस्तू व औषधी वगळता, अन्य दुकाने बंद राहणार असल्याने, जिल्हाभरातील नागरिकांनी आज खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. गोल बाजार, बंगाली कॅम्प, तुकूम, बाबूपेठ, दुर्गापूर येथील दुकानात वस्तू खरेदीला वेग आला होता.
मास्क न घातल्यास आता पाचशे रुपये दंड
जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. मात्र, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी टॅक्सीत चालक आणि ५० टक्के क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी आहे. बसच्या आसन क्षमतेनुसार प्रवाशी नेता येईल, पण उभ्याने जा-ये करण्यास परवानगी नाही. मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
२,१०० पोलीस, १६० अधिकारी तैनात
जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १६० अधिकारी, दोन हजार १०० पोलीस आणि ३५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे.