आजपासून देवी महाकाली यात्रेला प्रारंभ
By admin | Published: April 2, 2017 12:36 AM2017-04-02T00:36:48+5:302017-04-02T00:36:48+5:30
चंद्रपूरचे आराख्य दैवत देवी महाकालीच्या यात्रेला आज रविवारपासून प्रारंभ होत आहे.
भर उन्हातही उत्साह : भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल
चंद्रपूर : चंद्रपूरचे आराख्य दैवत देवी महाकालीच्या यात्रेला आज रविवारपासून प्रारंभ होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. अखेर प्रतीक्षा संपून ही यात्रा सुरू होत असल्याने राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे शुक्रवारी रात्रीपासूनच चंद्रपुरात दाखल होणे सुरू झाले. आजही भरउन्हात भाविक विविध वाहनांद्वारे महाकाली मंदिरात दाखल झाले. या यात्रेनिमित्त चंद्रपुरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मनपा प्रशासन या कामात व्यस्त आहे. असे असले तरी प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासनही या यात्रेकडे व भाविकांच्या सुविधांकडे लक्ष ठेवून आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या काळामध्ये चंद्रपुरातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यामध्ये बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्या-येण्यास किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड मार्गाचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरिता बंद करण्यात आल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गे जटपूरा गेटकडे येणारी दुचाकी, चारचाकी व इतर वाहने ही जटपूरा गेट बाहेर विरुध्द दिशेने न जाता सरळ मौलाना आझाद चौकातून, आझाद बगिचाच्या बाजुचे रिंग रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपूरा गेट मधून बाहेर जातील, अशी वाहतूक रचना प्रशासनाने केली आहे.
दरम्यान, यात्रेत येणाऱ्या भाविकांनी अधिकृत प्रवासी वाहनानेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने या परिसरातील साफसफाई मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली असून महाकाली मंदिरालगतचे झरपट नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. आंघोळीसाठी व पिण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने भाविकांसाठी तात्पुरते आरोग्य केंद्र मंदिर परिसरात उभारले आहे. या ठिकाणी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे. त्यांनी यात्रा परिसरात काही ठिकाणी पोलीस चौक्या उभरल्या आहेत. याशिवाय काही पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीवर तैनात ठेवले आहे. या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी चंद्रपूरचे नागरिक अन्य प्रदेशातून येणाऱ्या भाविकांचे मोठ्या आदरतिथ्याने स्वागत करतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात स्वंयसेवी संस्था या संदर्भात कार्यरत झाल्या आहेत.
महीनाभर चालणाऱ्या यात्रेत महाकालीच्या दर्शनासाठी येणारे स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील भाविक हे बहुतांशी वेगवेगळया प्रवासी वाहनातून प्रवास करुन येत असतात. तसेच प्रवासी वाहनाच्या व्यतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनामधूनही भाविक प्रवास करुन येत असतात. देवी महाकालीच्या दर्शनासाठी येताना बहुतेक भाविक वाहन प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसवून धोकादायक परिस्थितीत प्रवास करतात. अशावेळी एखादा दुदैवी अपघात घडतात. हे अपघात टाळले जावे, यासाठी वाहनांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)