घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:14 AM2019-07-15T00:14:14+5:302019-07-15T00:15:29+5:30
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले होते. हे काम करण्यासाठी खडकी (मेंढा ), नवेगाव पांडव, खैरीचक व कोदेपार येथे कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुरु केले होते. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आर्थिक बाबतीत आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.
अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरुच ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले होते. दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. या सत्तांतराने तरी या कालव्याच्या मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण या कालव्याच्या नशिबी असलेला भोग संपला नाही.
या कालव्याचा बहुतांश भाग नागभीड तालुक्यातून गेला आहे. मात्र तालुक्यातील शेतीला सकृतदर्शनी या कालव्याचा काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातून गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इरिगेशनसारखी योजना कार्यान्वित होऊ शकेल, या आशेवर या तालुक्यातील शेतकरी आहेत.
या पार्श्वभूमीवर या कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. खडकी (मेंढा), कोर्धा, कोदेपार येथे या कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असून कामही सुरू केले आहे.