चंद्रपूरच्या सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य सरकारचा पुरस्कार
By साईनाथ कुचनकार | Published: October 13, 2023 01:58 PM2023-10-13T13:58:10+5:302023-10-13T13:58:59+5:30
गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक
चंद्रपूर : येथील सिव्हिल लाइन, पटवारी ऑफिसजवळ असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य शासनाने आयोजित केलेल्या २०२३ गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या मंडळाने किल्ले रायगडचा देखावा सादर केला होता. विशेष म्हणजे, रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमही या मंडळाने गणेशोत्सवादरम्यान राबविले होते.
राज्य सरकारने यावर्षी पार पाडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना गुरुवारी पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे सांस्कृतिक तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उमेश दा. मुदलीयार आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त किल्ले रायगडचा देखावा सादर केला होता. हा देखावा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येक तीन व अन्य जिल्ह्यातील प्रत्येक एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेश मंडळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यासाठी निवड समितीचीही निवड करण्यात आली होती.