मत्स्यपालन, सिंगाडा उत्पादनासाठी हवे राज्य शासनाचे सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:33 AM2018-03-06T00:33:11+5:302018-03-06T00:33:11+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात.
आॅनलाईन लोकमत
सास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. यातूनच त्यांच्या कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह होते. परंतु, या व्यवसायाकरिता त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता त्यांना मोठ्या निधीची आवश्यकता पडत असून शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेले तलाव पंचायत समितीच्या मार्फतीने मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता लिजवर मत्स्यपालन सहकारी संस्थांना दिले जाते. परंतु, अशा तलावात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या इकोर्निया सदृष्य वनस्पती व गावातील कचºयामुळे मत्स्यपालन किंवा सिंगाडा शेती व्यवसाय करणे अवघड होते. त्याकरिता तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असते.
उत्पादनाचे स्वप्न रंगविणाºया या मच्छिमार संस्थांना रखरखत्या उन्हात तलाव स्वच्छ करण्याकरिता घाम गाळावा लागतो. यात मोठी मेहनत व आर्थिक फटका बसतो. राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेला मोठा तलाव आहे.
सदर तलाव पंचायत समितीच्या माध्यमातून मत्स्यपालन व सिंगाडा शेती व्यवसायाकरिता दरवर्षी सहकारी संस्थांना दिला जातो. राजुरा येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था १९६१ पासून दरवर्षी हा तलाव घेवून त्यात व्यवसाय करतात.
मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेत तिनशेहून अधिक सदस्य आहेत. त्यातील काही सदस्य हे तलाव घेवून सिंगाडा शेती व मत्स्यपालन करतात. परंतु, याकरिता तलाव स्वच्छ करणे गरजेचे असते. तसेच सिंगाडा लागवड करण्याकरिता व मत्स्यपालनाच्या बिजाई करिता त्यांना निधीची आवश्यकता असते. त्यामुळे तलावाची स्वच्छता करून दिली पाहिजे व बिजाईकरिता आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कार्लेकर, छबन पचारे, मारोती कार्लेकर, अशोक कार्लेकर, घनश्याम कार्लेकर आदींनी केली आहे. याची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे.
मत्स्यपालन व सिंगाडा शेती करण्याकरिता मच्छिमार बांधव मोठी मेहनत घेतात. परंतु, शेतकºयांप्रमाणेच आमच्याही पदरात काही येण्याआधीच संकटाची मालिका सुरू होते. सध्या एक नवे संकट उभे टाकले आहे. ते म्हणजे तलावात वाढलेली वनस्पती व कचरा. या वनस्पतीमुळे उत्पादन तर सोडाच, सिंगाडा लागवड करणेही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमार बांधवांना सिंगाडा शेतीसाठी व मत्स्यपालनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
- सर्वानंद वाघमारे, उपसरपंच, बामनवाडा