राज्यस्तरीय पीक स्पर्धा होणार; जिंकणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार इनाम !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:00 PM2024-07-06T15:00:42+5:302024-07-06T15:02:27+5:30
Chandrapur : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी पीकस्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, रागी, तूर सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. ही स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, संकेतस्थळ किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
अर्ज कुठे करावा व अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८-अ चा उतारा, जातप्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सात-बारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बैंक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत.
असे मिळणार बक्षीस
■ सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
■ तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये
■ राज्य पातळीवर पहिले बक्षीस ६० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये आहे.