सर्पमित्रांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:59+5:302021-03-26T04:27:59+5:30
महाराष्ट्र राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र वन्य जीवाच्या रक्षणासाठी काम करीत आहेत; मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ ...
महाराष्ट्र राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र वन्य जीवाच्या रक्षणासाठी काम करीत आहेत; मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणताही वन्यजीव पकडणे, बंदिस्त करणे गुन्हा आहे; परंतु मानवी वस्तीत येणाऱ्या सापाचे लोकांपासून संरक्षण व्हावे आणि लोकांचे सापापासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही.
सापाच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना कायद्याच्या बाहेर जावून काम करावे लागते. वन विभागाचे नियोजनबद्ध काम नसल्याने सापाची योग्य आकडेवारीची माहिती उपलब्ध नाही. साप बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ सापांची देवाण-घेवाण करणे, सापांचे खेळ करणे, तस्करी करणे यांसारख्या घटना वाढत आहेत, तसेच अप्रशिक्षित सर्पमित्रांना यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांची रितसर वन विभागात नोंद असावी. सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात यावे. युनिफाॅर्म, सेप्टीकिट देण्यात यावे. सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात यावे. सर्पमित्रांना मानधनाची तरतूद करण्यात यावी. सर्पमित्रांचा अपघात विमा काढण्यात यावा, अशा प्रकारच्या उपाययोजना शासनस्तरावर करण्यात याव्या. याकरिता वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी यांच्यावतीने वन परिक्षेत्राधिकारी यांच्या मार्फत मुख्यमत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्पमित्र अनुप येरणे, श्रीपाद बाकरे, प्रणय पतरंगे, शुभम मुरकुटे, गोलू चौखे, अमर किनाके, शिथिल महेशकर व इतर सर्पमित्र उपस्थित होते.