राज्याची वाटचाल प्रगतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:03 PM2019-08-05T23:03:38+5:302019-08-05T23:03:53+5:30
पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होणार पण जनतेच्या हितासाठी आम्ही काय केले, हे सांगून मतदारांचा आशीर्वाद मागण्यासाठी राज्यात महाजनादेश यात्रा काढण्यात आली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे सोमवारी चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर आगमन झाल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होणार पण जनतेच्या हितासाठी आम्ही काय केले, हे सांगून मतदारांचा आशीर्वाद मागण्यासाठी राज्यात महाजनादेश यात्रा काढण्यात आली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे सोमवारी चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर आगमन झाल्यानंतर आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार सुरजित ठाकूर, आमदार नाना शामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक जनता सुखी कशी होईल, यासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली. सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. त्यातून हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधून गावांना शहरांशी जोडले. ७ लाख घरे बांधून नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. धडाडीने निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केली. परिणामी, महाराष्ट्राची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून जनतेचे एकही प्रश्न मांडले नाही. आता ते जनतेच्या प्रश्नावर नव्हे तर इव्हीएमसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. पण, जनता अशा भूलथापांना बळी पडणार नसून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा महापराभव होणार आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे काश्मिर आता भारताचा अभिन्न अंग झाला आहे. काँग्रेसच्या चुकीमुळे हे कलम आजपर्यंत कायम होते, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ‘विदर्भाकरिता तिजोरी खुली करणारे’ या शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गौरव केला. प्रास्ताविक आमदार नाना श्यामकुळे तर संचालन श्याम हेडाऊ यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भयमुक्त, भूकमुक्त व विषमतामुक्त विकास- सुधीर मुनगंटीवार
राज्यातील विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत महत्त्वपूर्ण ठरली. ‘फॉयनॉन्स मिनिस्टर’ मधला ‘एम’ म्हणजे मी असलो तरी त्यातील ‘एफ’ म्हणजे फ डणवीस आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देत असतानाच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण आणि मोठे प्रकल्प उभे करण्यास यश आले. देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा, चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, आधुनिक सुविधायुक्त रूग्णालय, चिचडोह, दिंडोरा यासारखे सिंचन प्रकल्प, नुकतेच मंजूर झालेले कौशल्य विद्यापीठ यासारख्या अनेक विकास कामांमुळे चंद्रपूर जिल्हा प्रगतीकडे झेपावत आहे. यातून भयमुक्त, भूकमुक्त आणि विषमतामुक्त विकास साध्य होत आहे. त्यामुळे जनतेकडून मिळणारा मतरूपी आशिर्वाद असाच कायम राहावा, असे मत राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
महाजनादेश यात्रेचे मूल, सावली, वरोºयात स्वागत
मूल/सावली : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्प आपण पूर्ण केला असून कोटगल सिंचन प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. जिल्ह्याचे माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण व दुरूस्ती, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचाळा व सहा गावांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी २३ कोटी रू. किंमतीची योजना, नलेश्वर मध्यम प्रकल्पाचे काम अशी मोठया प्रमाणावर सिंचनाची कामे जिल्ह्यात झाली आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून हा जिल्हा समृध्द करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा जिल्हा महाराष्ट्रात विकास प्रक्रियेत अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मूल शहरातील कर्मवीर विद्यालयाच्या पटांगणात महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. अॅड.संजय धोटे, आ. देवराव होळी, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तत्पूर्वी ही महाजनादेश यात्रा सावली येथे आली. तिथेही यात्रेचे स्वागत करण्यात आले. व्याहाड खुर्द येथेही त्यांची सभा झाली. त्यानंतर वरोरा येथेही या यात्रेचे स्वागत करण्यात आले.