हागणदारीमुक्तीची स्थिती चिंताजनक

By admin | Published: November 30, 2015 12:53 AM2015-11-30T00:53:20+5:302015-11-30T00:53:20+5:30

राज्यात मागील दोन दशकांपासून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. अभियानाला लोकसहभाग मिळावा. राज्याचा ग्रामीण भाग हागणदारीमुक्त व्हावा.

The status of the abatement is worrisome | हागणदारीमुक्तीची स्थिती चिंताजनक

हागणदारीमुक्तीची स्थिती चिंताजनक

Next

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
राज्यात मागील दोन दशकांपासून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. अभियानाला लोकसहभाग मिळावा. राज्याचा ग्रामीण भाग हागणदारीमुक्त व्हावा. नागरिकांना निरामय आरोग्य जगता यावे, यासाठी अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते. गावखेड्यातील कोणीही उघड्यावर जाऊ नये, हा हेतू बाळगण्यात आला. मात्र आजघडीला राज्यात हागणदारी मुक्तीची स्थिती आकडेवारीनुसार चिंताजनक असल्याचे चित्र ग्रामीण महाराष्ट्राचे आहे.
राज्याच्या एकूण ३४ जिल्ह्यातील २७ हजार ८३१ ग्रामपंचायतीमधील ४१ हजार १४६ गावांपैकी केवळ ३ हजार ४५५ गावेच हागणदारी मुक्त झाले आहेत. यातील केवळ २ हजार ७२९ ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावर शौचालयास प्रतिबंध केला आहे. राज्यातील हागणदारी मुक्तीचे प्रमाण केवळ ९.८० टक्के असून विदर्भातील ११ जिल्ह्यातील एकूण ७ हजार १६० ग्रामपंचायतीपैकी केवळ २९३ ग्रामपंचायतीमधील ४७२ गावे हागणदारी मुक्त झाले आहेत. नागपूर व अमरावती विभागातील हे प्रमाण केवळ ४.०९ टक्के इतके आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह लागल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वीच्या केंद्र व राज्यातील आघाडी सरकारने २ आॅक्टोबर २००५ साली स्वच्छतेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी देशपातळी गाठली. मात्र स्वच्छता अभियानाला अपवादात्मक गावे सोडली तर लोक चळवळीचे स्वरूप अद्यापही आले नाही. परिणामी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण महाराष्ट्र उकीरडामुक्त, गटारमुक्त, हागणदारी मुक्त व व्यसनमुक्त करण्यास यश आले नाही. शासनस्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र अधिकारी, पदाधिकारी व गावकऱ्यांतील संवाद व समन्वयाअभावी हागणदारी मुक्तीला मूर्तरूप अद्याप देता आले नाही.
आताच्या केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश ‘स्वच्छ भारत’ करण्याचा संकल्प सोडला आहे. यात ग्रामीण भागाला अधिक महत्व देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबरला ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून साजरा केला. स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अभियानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची, मानसिकता तयार करण्याचे ध्येय बाळगण्यात आले. राज्य सरकारने तर वाशिम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे, यवतमाळ जिल्ह्यातील चैताली राठोड व नाशिक येथील सुवर्णा लोखंडे यांची प्रेरणा घेऊन लोकांनी शौचालय बांधकाम करून वापरात आणावा, यासाठी स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली. स्वच्छता मिशनला गतीमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
स्वच्छता मिशन आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याचा प्रघात पाडला आहे. ५०० रुपयांपासून अनुदान वाटपाला सुरूवात करण्यात आली. आजघडीला त्यात वाढ होऊन प्रति कुटूंब १२ हजार रुपये अनुदान दिले जात आहे.
मात्र अनुदान लाटण्यापर्यंत नागरिकांची मानसिकता झाली आहे. परिणामी गावागावात हागणदारी मुक्तीचे अपेक्षीत ध्येय गाठण्यास प्रशासकीय यंत्रणेला यश आले नाही. आजही स्वच्छता अभियान नागरिकांना स्वत:चे वाटत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी व गावकरी यांच्यातील समन्वयाला गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे मात्र तेवढेच खरे आहे !

योजनेला उदासीनतेचे ग्रहण
स्वच्छ भारत मिशन - ग्रामीणची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील ५४९ ग्रामपंचायतीमधील ८७६ गावांपैकी एकही गाव हागणदारी मुक्त झाल्याचे अहवालात दर्शविण्यात आले नाही. तीच स्थिती गडचिरोली जिल्ह्यातील असून ४६७ ग्रामपंचायतीमधील १ हजार ५२५ गावांची आहे. अकोला जिल्ह्यात ५४३ ग्रामपंचायतीपैकी २६, अमरावती ८३९ पैकी ४१, भंडारा ५३८ पैकी ४५, बुलढाणा ८६८ पैकी ३०, चंद्रपूर ८४६ पैकी २९, वर्धा ५१३ पैकी २५, वाशिम ४९३ पैकी १० तर यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी केवळ ३३ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचे अहवालात म्हटले आहे. याला कारणीभूत अभियानातील उदासीनता आहे.

हागणदारी मुक्तीत बल्लारपूर तालुका आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या तालुक्यात पायाभूत सर्वेक्षणानुसार २०१२ च्या आकडेवारीत एकूण कुटूंब संख्या ९ हजार ९०६ इतकी आहे. यातील आॅक्टोबर महिन्याअखेर ८ हजार ५९० कुटूंबाने शौचालय बांधकाम करून वापरात आणले आहे. मात्र अद्यापही १ हजार ३१६ कुटूंब शौचालयापासून वंचित आहेत. बामणी (दुधोली), आमडी व हडस्ती ग्रामपंचायतीने टक्केवारी गाठली असून हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली. ९ ग्रामपंचायतीची आगेकुच सुरू असून डिसेंबर- जानेवारीपर्यंत संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाने केला. आजघडीला तालुक्यातील हागणदारीमुक्त करण्याचे प्रमाण ८६.७२ टक्क्यावर आहे. विसापूर व कोठारी ग्रामपंचायतीने सरासरी पूर्ण केल्यास हागणदारीमुक्तीत विदर्भात अव्वल स्थान गाठण्यास सिध्द होणार आहे.

Web Title: The status of the abatement is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.