कुठल्याही पक्षात राहा, पण कार्य बाबासाहेबांचे करा - राजकुमार बडोले
By admin | Published: April 9, 2015 01:19 AM2015-04-09T01:19:17+5:302015-04-09T01:19:17+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा, महानतेचा, करूणेचा रथ हा कुठेही न थांबता असाच पुढे जावो,
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा, महानतेचा, करूणेचा रथ हा कुठेही न थांबता असाच पुढे जावो, अजूनही पुढे जावो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमाणसापर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रबोधनकार अनिरूद्ध वनकर सातत्याने करीत आहेत. लंडन स्कुल आॅफ एकानामिक्समध्ये प्रत्येक वर्षी भारतातील दोन विद्यार्थी पाठविण्याचे आणि तिथे आंतरराष्ट्रीय स्मारक बनावे, अशी इच्छा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात रविवारी जयभीम फेस्टीवलच्या उद्घाटनीय समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, औद्योगिक दृष्टीने मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहराकडे बघितले असता हे शहर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यापेक्षा खूप विकसित आहेत. पण औद्योगिक सहकारी संस्थांच्या मदतीने आपणही आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतो. व्यवसायासाठी महिला व युवकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कुणी कोणत्याही पक्षात राहो, परंतु डॉ. बाबासाहेबांचे कार्य त्यांनी अवश्य करावे, असे प्रतिपादनही ना. बडोले यांनी यावेळी केले.
लोकजागृती संस्था चंद्रपूर, एमडी (म्युजिक अॅन्ड ड्रामा) वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. विचार मंचावर विशेष सत्कारमूर्ती राष्ट्रपती अवार्ड महिला उद्योगपती कल्पना सरोज, मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर, रिपाई नेते पुरुषोत्तम भागवत, रमेशचंद्र राऊत, मेघराज कातकर, हरीश दुर्योधन, गोपालराव देवगडे उपस्थित होते.
याप्रसंगी अनिरूद्ध वनकर संपादित ‘वादळवारा निळा’ या साप्ताहिकाचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
या समारंभात विशेष सत्कारमूर्ती पद्मश्री कल्पना सरोज यांचा साडी-चोळी भेट व बुद्धाची शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावरील उपस्थित रिपाई नेत्यांचाही बुद्धाची शिल्ड भेट देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध वनकर यांनी केले. संचालन भारत रंगारी, मनिष भसारकर यांनी केले व आभार युवराज चुनारकर यांनी मानले.
नवोदिता संस्थेचे ‘चिंधी बाजार’ हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ठरले. यानिमित्त या नाटकाचे निर्माता अजय धवने यांना बुद्धाची शिल्ड भेट देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच दिग्दर्शिका प्रा. डॉ. जयश्री कापसे-गावंडे, अभिनेत्री नुतन धवने यांचाही साडी-चोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चिंधी बाजार या नाटकाचे सादरीकरणही करण्यात आले. नाटकाचा रसिकांनी लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)