रेनवॉटर हार्वेस्टींग करणाऱ्यांना मालमत्ता करामध्ये सुट
By admin | Published: May 25, 2016 01:31 AM2016-05-25T01:31:10+5:302016-05-25T01:31:10+5:30
पावसाचे पाणी विनाकारण वाहून जाऊ नये, ते जमितीत मुरावे याकरिता प्रत्येक घरावर रेनवाटर हार्वेस्टिंग ....
२०० घरांवर हार्वेस्टींग लावण्याचा संकल्प
बल्लारपूर : पावसाचे पाणी विनाकारण वाहून जाऊ नये, ते जमितीत मुरावे याकरिता प्रत्येक घरावर रेनवाटर हार्वेस्टिंग (पर्जन्य जल पुनर्भरण) लावणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन नागरिकांना त्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी, आपल्या घरांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग लावणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सुट देण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. त्याचप्रकारे पाण्याची बचत कशी होईल, याकरिता विविध कार्यक्रम व उपक्रम नगर परिषदेने आखले आहेत.
याबबत नगर परिषदेने नागरिकांची एक सभा पालिकेच्या सभागृहात नुकतीच घेतली. त्यात सामाजिक व सेवाभावी संस्था, शिक्षक, उद्योजक, व्यापारी आणि बिल्डर्स हजर झाले होते. मुख्याधिकारी विपीन मुंदधा यांनी पाण्याची भीषण टंचाई या भागातही उद्भवू शकते. तसे भविष्यात होऊ नये याकरिता आतापासूनच काय उपाय योजना करावी लागणार आहे, याची रुपरेषा मांडली. यावर महत्त्वाचा आणि प्राथमिक उपाय प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग लावणे आहे. या कामाकरिता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून साऱ्यांनी तयारी दर्शवावी व या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
मुख्याधिकरी यांच्या आवाहनावर उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, बिल्डरांनी, आपण ज्या घराच्या बांधकामाचे ठेके घेतले आहेत, ते पूर्ण झालेले वा निर्माण अवस्थेतील, सर्वांवर स्वखर्चाने रेनवॉटर हार्वेस्टिंग लावून देण्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे पााणी बचतीचा संदेश देणारी जी साधने आहेत, त्याद्वारे घरोघरी जावून पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे काम आंबेडकर क्रिएटीव्ह ग्रुपने करण्याचे ठरविले आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या सहयोगाने जनजागृती करण्याचा संकल्प केला. सेवाभावी संस्थाही या कामी सहकार्य करण्याचे बोलले.
यापुढे नगर परिषद हद्दीतील बांधकामांना मंजुरी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प घराच्या छतावर लावणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे नवीन घरावर हार्वेस्टिंग असतील, त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येईल, अन्यथा नाही, असे कडक नियम पाणी बचत व जल पुनर्भरण याकरिता नगर परिषदेने आखले आहे. उपस्थितांच्या सूचनाही या सभेत नोंदविण्यात आल्या. ही सभा नगराध्यक्षा छाया मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. न.प. च्या जल पुनर्भरण अभियानात जनतेनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल तथा नगरसेवक, सभापती यांची याप्रसंगी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
स्वस्त व सोपी पद्धत
रेनवॉटर हार्वेस्टिंग ही सोपी व खर्चाने स्वस्त अशी सहा हजार रुपयाची पद्धत आहे. ती स्वखर्चाने लावावे लागेल. खरे तर जमिनीतील पाण्याचा वारेमाप उपसा करुन त्याची वैयक्तिक उधारी आपण केली आहे. ही उधारी फेडणे आपण साऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. ही बाब या सभेत लोकांच्या मनात प्रामुख्याने बिंबविण्यात आली. या कर्जातून मोकळे होण्याकरिता रेनवॉटर हार्वेस्टिंग हा सगळ्यात चांगला व साऱ्यांना उपयुक्त असा उपाय आहे.
शासकीय कार्यालयांवर लागणार
रेनवॉटर हार्वेस्टींग
बल्लारपूर नगर परिषदेने नगर परिषद भवन, नगर परिषद शाळांच्या इमारती, बचत भवन इत्यादी इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग बसविण्याचे निश्चित केले आहे. त्यातील काही कामांना प्रारंभही झाला आहे. शहरातील शासकीय इमारती, औद्योगिक प्रतिष्ठान, त्यांच्या कर्मचारी वसाहती या ठिकाणीही रेनवॉटर हार्वेस्टिंग लावले जाणार आहे. एकंदरीत साऱ्यांनी ही बाब गांभीर्याने मनावर घेतली आहे.