स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटच्या बसने चौकीदाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:44 PM2018-10-03T22:44:04+5:302018-10-03T22:44:24+5:30
स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटच्या स्कूलबसने शाळेचे चौकीदार पुंडलिक रामटेके (४२) यांना शाळेच्या आवारातच चिरडले. त्याच्या छातीवरुन स्कूलबस गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटच्या स्कूलबसने शाळेचे चौकीदार पुंडलिक रामटेके (४२) यांना शाळेच्या आवारातच चिरडले. त्याच्या छातीवरुन स्कूलबस गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी घडली.
यात मृतकाची तिसऱ्या वर्गात शिकणारी मुलगी खुशी रामटेके ही थोडक्यात बचावली. स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट बामनवाडा येथे याच शाळेचा चौकीदार पुंडलिक रामटेके हा खुशी हिच्या शाळेच्या बॅगची चैन बरोबर नसल्यामुळे लावत होता. तेवढ्यात बस आली. खुशी बसखाली येईल म्हणून तिला वाचविण्यासाठी पुंडलिक धावले व त्यांनी खुशीला बाजूला ढकलले. तेवढ्यात स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटची स्कूल बसने चौकीदार पुंडलिक रामटेके यांच्या छातीवरुनच गेली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली. चालक मनोहर नगराळे (५२) याच्याविरुध्द राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बसच्या अपघातामुळे शाळेच्या मुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतक चौकीदार पुंडलिक रामटेके यांना शाळा प्रशासनाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी राजुरा ब्लॅक पँथर ग्रुपचे अध्यक्ष विजय चन्ने यांनी केली आहे.